घरपालघरवसईत 'एवढी' असुरक्षित ठिकाणे

वसईत ‘एवढी’ असुरक्षित ठिकाणे

Subscribe

निर्जनस्थळी, असंवेदशील आणि सुरक्षेची उपाययोजना नसलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना वसई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी वसई-विरार महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.

वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्रात तब्बल 550 असुरक्षित ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत. या निर्जनस्थळी, असंवेदशील आणि सुरक्षेची उपाययोजना नसलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना वसई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी वसई-विरार महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वसई परिमंडळ-2 व विरार परिमंडळ-3 या क्षेत्रांत मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ झालेली आहे. या क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रही प्रचंड प्रमाणात विस्तारित झालेले आहे. या सगळ्याचे परिणाम म्हणून समाजात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झालेली आहे. मुली, महिला व लहान बालक या अत्याचारांना बळी पडत आहेत.

वसई परिमंडळ-2 व विरार परिमंडळ-3 कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्जनस्थळे, संवेदनशील आणि सुरक्षेची योजना नसलेली ठिकाणे मोठ्या प्रमाणात आढळलेली आहेत.वसई तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामुळे महिला कामगार कामानिमित्त बाहेर पडलेले असतात. अशा वेळेला धोकादायक ठिकाणी स्त्री अत्याचारासारखा गंभीर गुन्हा घडण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेनिहाय पाहणी करून असुरक्षित ठिकाणांची यादी तयार करण्यात आलेली आहे. यात परिमंडळ-2 वसई कार्यक्षेत्रातील 351 व परिमंडळ-3 विरार कार्यक्षेत्रातील 199 अशी 550 असुरक्षित ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. ही यादी पोलीस आयुक्तालयाकडून वसई-विरार महापालिकेला सादर करण्यात आली आहे. या असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, बॅरीगेटींग तसेच प्रखर प्रकाश योजना करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यामुळे समाजकंटकांकडून महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना टाळता येतील, अशी आशा पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिका शहरात पीपीपी तत्त्वावर तीनशे स्मार्ट पोल उभारणार आहे. या योजनेंतर्गतच पोलिसांनी निश्चित केलेल्या असुरक्षित ठिकाणीदेखील हे स्मार्ट पोल उभारण्यात येणार असल्याचे कळते. या स्मार्ट पोलमध्ये इंटरनेट, सीसीटीव्ही कॅमेरा, माहिती घोषणा, प्रखर प्रकाश योजना आणि जाहिरात फलक इत्यादी सुविधा असणार आहेत. विशेष म्हणजे या कामाला महापालिकेने सुरुवातही केली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -