घरपालघरशिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका

शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका

Subscribe

त्यातच पोषण आहार शिजवण्यासाठी भाजीपाला ,तेल व इंधन खरेदीसाठी शासनाकडून कोणताही अग्रिम मिळत नसल्याने या खर्चासाठी शिक्षकांवर उसनवारी करून आर्थिक ताण सहन करण्याची वेळ येत होती.

वाडा :  पालघर जिल्ह्यातील वाडा , विक्रमगड व पालघर तालुक्यातील शालेय पोषण आहार शिजवून देण्यास इस्कॉन संस्थेच्या अन्नामत फाऊंडेशनला शासनाची मंजुरी मिळाली असून, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी होणार असल्याने शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे. राज्यातील जि प शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील ई 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती मिशन अंतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये वरन भात , आमटी भात व आठवड्यातून एकदा पूरक आहार याचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड व पालघर तालुक्यातील 860 शाळांमधील 88342 विद्यार्थ्यांना इस्कॉन संस्थेच्या अन्नाम्रृत फाऊंडेशन व श्री स्वामी महिला बचत मंडळ मुंबई या संस्थांमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जायचा. परंतु 2022-23 या शैक्षणिक वर्षांपासून हा पोषण आहार शिजवून देण्याचे अचानक बंद झाल्याने पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांवर येवून पडली होती. यासाठी शासनाने नेमलेल्या भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मुंबई यांमार्फत शाळांना डाळी व धान्यादी मालाचा पुरवठा केला जात असून, भाजीपाला, तेल व इंधनाची व्यवस्था करण्याची व पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर येवून पडली होती. या अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांवर मोठा ताण असून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यातच पोषण आहार शिजवण्यासाठी भाजीपाला ,तेल व इंधन खरेदीसाठी शासनाकडून कोणताही अग्रिम मिळत नसल्याने या खर्चासाठी शिक्षकांवर उसनवारी करून आर्थिक ताण सहन करण्याची वेळ येत होती.

प्राथमिक शिक्षक संचालक महेश पालकर यांनी पालघर शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार वाडा ,विक्रमगड व पालघर तालुक्यातील 782 शाळांमधील विद्यार्थ्यांना 2022-23 या शैक्षणिक वर्षांपासून पुढील तीन वर्ष इस्कॉन संस्थेच्या अन्नामृत फाऊंडेशनमार्फत पोषण आहार शिजवून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या 11जुलै 2014 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा पोषण आहार शिजवून दिला जाणार आहे. पोषण आहार केंद्रीय स्वयंपाक घर पद्धतीने शिजवून देण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणारे पालघर जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनेश पाटील यांनी शासनाच्या या मंजुरीचे स्वागत केले असून अन्नाम्रृत संस्थेमार्फत पोषण आहार शिजवून दिल्याने विद्यार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा होणार असून, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी होणार असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देवू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -