घरपालघरदिल्लीतील साहित्योत्सवात वसईचे डॉ. सखाराम डाखोरे करणार प्रतिनिधीत्व

दिल्लीतील साहित्योत्सवात वसईचे डॉ. सखाराम डाखोरे करणार प्रतिनिधीत्व

Subscribe

या साहित्योत्सवात १३ मार्च रोजी सुप्रसिद्ध साहित्यिका उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या आदिवासी कविसंमेलनात आपल्या आंध आदिवासी समाजात बोलल्या जाणार्‍या ’आंधी’ बोलीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

वसईः सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारद्वारे संचालित, दिल्ली येथील साहित्य अकादमी या संस्थेच्या साहित्यसेवेला ७० वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने सोमवारी ११ ते शनिवारी १६ मार्च २०२४ या दरम्यान नवी दिल्ली येथे जगातील सर्वात मोठा ’साहित्योत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. १७५ पेक्षा अधिक सत्रांमध्ये विभागलेल्या या साहित्योत्सवात सबंध देशभरातून ११०० च्यावर साहित्यिक सहभागी होणार आहेत. १७५ च्यावर बोलीभाषांचे प्रतिनिधी यावेळी आपापल्या बोलींचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, लेखकांबरोबरच वसई येथील सुप्रसिद्ध कवी डॉ. सखाराम डाखोरे हेसुद्धा या साहित्योत्सवात १३ मार्च रोजी सुप्रसिद्ध साहित्यिका उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या आदिवासी कविसंमेलनात आपल्या आंध आदिवासी समाजात बोलल्या जाणार्‍या ’आंधी’ बोलीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

२०१९ मध्ये डाकोरे यांचा ’रानवा’ हा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. या कवितासंग्रहातील ’बिरसाईता’ ही कविता छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, बीएसडब्ल्यू, बीएफए ह्या अभ्यासक्रमांमध्ये अभ्यासली जात आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये वास्तव्य करणारा आंध आदिवासी समाज संस्कृती, रूढी-परंपरा, संस्कार आणि बोलीभाषेने संपन्न आहे. परंतु काळाच्या ओघात त्यांच्या अस्तित्वाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगामधील अनेक बोली नष्ट झाल्या व असंख्य बोली नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या बोलीचे जिवंतपण कायम ठेवायचे असेल तर त्यामधून अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. या उद्देशानेच जागतिक विक्रम ठरणार्‍या साहित्य अकादमीच्या या उपक्रमात मुळचे परभणी जिल्ह्यातील, जिंतूर तालुक्यात असलेल्या केहाळ या गावचे रहिवाशी असलेले डॉ. सखाराम डाखोरे हे स्वतःच्या बोलीत कविता सादर करून आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या सादरीकरणाने ’आंधी’ बोलीची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणार असल्यामुळे त्यांच्या समाजाचा हा सन्मान आहे असे ते म्हणाले. मागील १४ वर्षांपासून वसई येथील अण्णासाहेब वर्तक मानव्य पदवी महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करणार्‍या डॉ. सखाराम डाखोरे यांनी अनेक साहित्य संमेलने, व्याख्याने व परिसंवादांमधून आपल्या समाजाचे तसेच भाषेचे प्रतिनिधित्व केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -