आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन हे श्रीनगर येथे आहे. शनिवारपासून हे गार्डन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. संबंधित विभागाचे आयुक्त सचिव शेख फयाज अहमद यांनी हे गार्डन आता पर्यटकांसाठी खुले केल्याची माहिती देण्यात आली आहे.
55 हेक्टरमध्ये पसरलेल्या या गार्डनमध्ये यावेळी जवळपास 17 लाख ट्युलिप फुले फुलल्याची माहिती आहे. हे गार्डन दल लेक आणि झाबरवान हिल्स जवळ आहे.
इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे जगभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. हे गार्डन पूर्वी सिराज बाग म्हणून ओळखले जायचे. या गार्डनमध्ये यंदा वेगवेगळ्या रंगाची ट्युलिप फुले लावण्यात आली आहेत.
फ्लोरिकल्चर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विविध रंगाची ट्युलिप फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे.
या गार्डनमध्ये फुले ही टप्प्याटप्प्याने लावली जातात जेणेकरून बागेत फुले अधिक काळ फुललेली राहतील. यंदा ट्युलिप फुलांच्या आणखी 5 नव्या जाती पाहायला मिळणार आहेत. तसेच गार्डनची जागा देखील वाढवण्यात आली आहे.
जेव्हा बाग पूर्णपणे बहरते, तेव्हा ट्युलिप्सचे इंद्रधनुष्यच दिसते, असे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.