जिल्ह्यातून तीन महिन्यांत ४७ बालिका बेपत्ता

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील २८ विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ४७ बालिका बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर ११ बालकेही गायब असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात २८ पोलीस ठाण्यांमध्ये ५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अलिबाग: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील २८ विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ४७ बालिका बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर ११ बालकेही गायब असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात २८ पोलीस ठाण्यांमध्ये ५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशातील काही भागात महिला आणि मुली गायब होण्याचे प्रकार घडत असल्याच्या घटनांनी खळबळ माजली असतानाच राज्यातही तीन महिन्यांत ५ हजारांहून अधिक मुली हरवल्याचे समोर आले. आता रायगड जिल्ह्यातही असे प्रकार घडल्याच्या घटनांची आकडेवारी पुढे आल्याने हा चिंतेचा बनला आहे. तथापी पोलादपूर, महाड एमआयडीसी, श्रीवर्धन, दीघी सागरी, म्हसळा, कोलाड, मुरुड, तळा, दादर सागरी आणि मांडवा सागरी या दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकाही मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला नाही, ही बाब दिलाससादायी मानली जात आहे.
गेल्या तीन महिन्यात ११ बालके गायब झाल्याचे गुन्हे देखील नोंद आहेत. यात कर्जतमध्ये तीन, रसायनीतून दोन तर रोहा, कोलाड, नेरळ, खोपोली, पेण आणि रेवंदडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक बालक गायब झाल्याची नोंद आहे. एकूण ५८ अल्पवयीन मुले-मुली गायब असल्याने त्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान आता पोलीस दलासमोर आहे.

विविध तालुक्यांमध्ये घटना
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात पनवेल आणि उरण तालुका वगळता १३ तालुक्यांचा समावेश आहे. या १३ तालुक्यांमध्ये २८ पोलीस ठाणी आहेत. अलिबाग, कर्जत आणि नेरळ या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी पाच मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर रोहे, रसायनीमधून चार मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खालापूर, पेण आणि पाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. माणगाव, गोरेगाव, नागोठण्यातून प्रत्येकी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर महाड तालुका, महाड शहर, माथेरान, खोपोली, वडखळ, पोयनाड आणि रेवदंडा या पोलीस ठाण्यातून प्रत्येकी एक मुलगी बेपत्ता आहे.
==============