घररायगडजन्मतःच बाळाचा मृत्यु; दोषींवर कारवाई करण्याची पिडित महिलेची मागणी

जन्मतःच बाळाचा मृत्यु; दोषींवर कारवाई करण्याची पिडित महिलेची मागणी

Subscribe

सुमारे बारा तास बाळंतपणाच्या तीव्र कळा सहन करत असह्य वेदनेने तळमळत असताना उपजिल्हा रुग्णालय कर्जत व उल्हासनगर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे एका आदिवासी महिलेचे धावत्या रुग्णवाहिकेत बाळंतपण झाले आणि पोटातच मृत झालेल्या बाळाचा जन्म झाला. जन्म झाला असे तरी कसे म्हणता येईल? कारण बाळ हे मृतावस्थेत या जीवसृष्टीवर दाखल झाले तेही शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अक्षम्य बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे...; अशा आरोग्य यंत्रणेच्या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होऊन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची पिडीत आदिवासी महिलेने केली आहे. 

कर्जत: सुमारे बारा तास बाळंतपणाच्या तीव्र कळा सहन करत असह्य वेदनेने तळमळत असताना उपजिल्हा रुग्णालय कर्जत व उल्हासनगर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे एका आदिवासी महिलेचे धावत्या रुग्णवाहिकेत बाळंतपण झाले आणि पोटातच मृत झालेल्या बाळाचा जन्म झाला. जन्म झाला असे तरी कसे म्हणता येईल? कारण बाळ हे मृतावस्थेत या जीवसृष्टीवर दाखल झाले तेही शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अक्षम्य बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे…; अशा आरोग्य यंत्रणेच्या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होऊन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची पिडीत आदिवासी महिलेने केली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी नावाच्या आदिवासी वाडीतील आदिवासी गरोदर महिला संगीता विठ्ठल पवार (३० वर्षे ) हिला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्यामुळे तिला तिचा पती व तिच्या आईने मिळेल त्या वाहनाने सकाळी नऊ वाजता कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तिला तपासुन आम्ही बाळंतपण करु शकत नाही, तुम्हाला उल्हासनगर येथील रुग्णालयात घेऊन जावे लागेल असे सांगितले व त्यांनी क्षणातच स्थानांतरण दाखला देऊन संगीता व तिच्या पती व आईस सकाळी साडे नऊ वाजता उपजिल्हा रुग्णालयातुन रुग्णवाहिकेतून उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात धाडले.
एवढं करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी झटकुन ते नामानिराळे राहिले. संगीता पवार असह्य वेदनेने विव्हळत असताना रुग्णवाहिका उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात साडे अकरा, बाराच्या दरम्यान पोहचली व तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सुरुवातीला तिला दाखल करुन घेतले आणि तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले व तिच्यानंतर दाखल झालेल्या गरोदर महिलांची डिलिव्हरी करायला लागले. तोपर्यंत इकडे संगीता हिच्यावर कुठल्याही प्रकारे उपचार करण्यात आले नाही आणि संध्याकाळी पाच वाजता येथील अधिकार्‍याने संगीता पवार व तिच्या पतीस असे सांगितले की, तुमची डिलिव्हरी आम्ही करु शकत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता दुसर्‍या रुग्णालयात पेशंटला घेऊन जावा.
सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाळंतपणाच्या असह्य कळा सोसणार्‍या संगीता आणि तिचा विठ्ठल नावाच्या आदिवासी पतीवर डॉक्टरांनी आत्ताच्या आत्ता दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा असे त्यांना आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला शहरातील काही माहिती नाही, तुम्ही इथेच बाळंतपण करा अशी हात जोडुन कित्येकदा विनवणी केली. पण, हतबल झालेल्या कलियुगातील विठ्ठल पवार नामक आदिवासीला कुणी तरी सांगितले की, १०८ नंबरला फोन कर आणि रुग्णवाहिका बोलव. मग, त्या विठ्ठलने सायंकाळी साधारण साडे पाच वाजता १०८ नंबरवरच्या रुग्णवाहिकेस फोन करुन परिस्थिती सांगितली व उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात येण्याची विनंती केली. तास दोन तास, अडीच तास झाले त्या दरम्यान अनेकदा रुग्णवाहिकेच्या चालकास त्याने फोनही केले. पण, येतो येतो म्हणणारी रुग्णवाहिका मात्र आलीच नाही. रात्रीचे आठ वाजायला आले. संगीता वेदनेने तळमळत होती जणु ती अर्धमेल्यासारखी झाली होती. पण, कुणालाही तिची दयामाया मात्र आली नाही.
शहरातील काही माहित नाही नसलेल्या विठ्ठलने गावाजवळील वंजारवाडी गावातील महेश गंगावणे यांना फोन करून झालेला प्रकार सांगितला व काही मदत करता येईल का अशी विनंती केली. त्यावेळी महेश गंगावणे यांनी त्याला बाहेर कुठे रुग्णवाहिका आहे का ते बघ आणि मला फोन कर मी काही तरी प्रयत्न करतो असे सांगितलेआणि रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिका शोधत असताना त्याला एक खाजगी रुग्णवाहिका दिसल्यावर त्याने पुन्हा गंगावणे यांना फोन केला. तेव्हा ते रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला बोलले की संगीता पवार हिला लवकरात लवकर कळवा येथील रुग्णालयात घेऊन जा, तुमचे काय भाडे असेल ते मी देतो. महेश गंगावणे यांनी अडीच हजार रुपये रुग्णवाहिकेचे भाडे ड्रायव्हरला फोनद्वारे पाठवल्यावर तो त्यांना उल्हासनगरमधील रुग्णालयातुन कळवा येथील रुग्णालयात घेऊन जात असताना रात्री साडे आठ वाजता असह्य वेदनेने चालत्या रुग्णवाहिकेतच संगीता पवार हिची डिलिव्हरी झाली. पण, डिलिव्हरी होताना बाळ मृतावस्थेत जन्मले व तिची खुप भयंकर अवस्था झाली. त्याचदरम्यान रुग्णवाहिकेचा टायरही पंक्चर झाला होता. तरीही त्याच परिस्थितीत ते कसे तरी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. कलवा येथील रुग्णालयात संगीता पवार दोन ते तीन दिवस मृत्युशी झुंज देत होती.

मी रुग्णालयात उपस्थित नव्हतो. परंतु, मी खात्री केल्यावर असे निदर्शनास आले आहे की, सदर प्रकरणात आमच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांची काहीही चुक नाही.
– डॉ. बनसोडे,
वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय

- Advertisement -

जर गरोदर आदिवासी महिलेची हेळसांड झाली असेल तर आमच्याकडे लेखी तक्रार करा.
– डॉ. सुहास माने,
जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड अलिबाग

तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्या अनुषंगाने कमिटी स्थापन करुन योग्य ती चौकशी करु.
– डॉ. हेमंतकुमार बोरसे,
उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे

- Advertisement -

सदर पिडित आदिवासी कुटुंबांला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांच्यामुळे ह्यांचं बाळ दगावले आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्यांची ही मागणी पुर्ण व्हायलाच पाहिजे आणि अशा बेजबाबदार डॉक्टरांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे.

– दिगंबर चंदने,
सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -