घररायगडकर्जत - माथेरान मिनी बस अखेर सुरू, नगराध्यक्षांसह शिष्टमंडळाने घेतली परिवहन मंत्र्यांची...

कर्जत – माथेरान मिनी बस अखेर सुरू, नगराध्यक्षांसह शिष्टमंडळाने घेतली परिवहन मंत्र्यांची भेट

Subscribe

माथेरानची मिनीबस सेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, नगरसेवक तथा शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी भेट घेतली.

राज्य परिवहन मंडळ कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बस सेवा खंडित झाली होती. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले होते. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ माथेरानदेखील यातून सुटले नव्हते.

यासंदर्भात १४ फेब्रुवारी रोजी मिनी बसच्या प्रतिक्षेत माथेरानचे विद्यार्थी अशी बातमी दैनिक आपलं महानगर ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत माथेरानची मिनीबस सेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, नगरसेवक तथा शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी भेट घेतली. यावेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी होणार्‍या समस्या मांडल्या. मंत्री अनिल परब यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक विपुल शिंदे यांना याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना सूचना करण्यास सांगितले.

- Advertisement -

त्यानुसार शिंदे यांनी रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांच्याशी बोलून विशेष बाब म्हणून तातडीने बससेवा सुरु व्हावी यासाठी सूचना केल्या. त्यानुसार युद्ध पातळीवर मिनीबस मेन्टेनेन्स, तपासणी तसेच चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी ४ मार्चपासून माथेरानकर आणि विद्यार्थ्यांसाठी कर्जत – माथेरान मिनी बस सुरू करण्यात आली.

पेण येथील रायगड विभाग नियंत्रक कार्यालयात़ अनघा बारटक्के यांची नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, अजय सावंत, विवेक चौधरी, प्रसाद सावंत यांनी भेट घेतली. मिनी बस सेवा तातडीने पुर्ववत केल्यामुळे बारटक्के यांचे त्यांनी आभार मानले. दहावी, बारावी परीक्षांच्या काळात विशेष बाब म्हणून मिनी बस सेवा तात्काळ सुरु केल्याने विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -