घररायगडMahad Road News : महाडकरांचा प्रवास खड्ड्यांतूनच...

Mahad Road News : महाडकरांचा प्रवास खड्ड्यांतूनच…

Subscribe

नगरपालिका हद्दीतील रस्त्यांमधील खड्ड्यामुळे महाडतर मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यामुळे अंतर्गत प्रवास जिकरीचा झाल्याने महाडकरांना त्रासासोबतच वाहनांच्या दुरुस्तीसाठी वाढीव खर्च करावा लागत आहे.

महाड : शहरातील रस्त्यांच्या खड्डे बुजवण्याचा कामाचा वेग मंदावल्याने महाडकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. महाडमधील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांचे जोड आणि विविध कारणांसाठी खोदलेले रस्ते यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन वाहन दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याच्याही महाडकरांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाला नगरपालिकेने वेग द्यावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

महाड शहरातील बहुतेक रस्ते 10 वर्षांपूर्वीच सिमेंट कॉँक्रीटचे करण्यात आले आहेत. त्यानंतर या रस्त्यांवर विकासकामांच्या निमित्ताने अनेक खोदकामे करण्यात आली. महाडकरांनीही पाण्याच्या जोडणीसाठी पाईप टाकताना खोदकाम केले आहे. वेळोवेळी खोदलेले रस्ते त्या-त्या वेळी दुरुस्त न केल्याने सिमेट काँक्रिटच्या रस्त्यांची दूरवस्था झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Loksabha Election 2024 : वाढत्या उन्हासोबत रायगडमधील राजकारणही तापलं

या रस्त्यांवर आहेत खड्डे?

एसटी डेपो ते शिवाजी चौक ते दस्तुरी नाका आणि दस्तुरी नाका येथून नाते खिंडीकडे जाणारा रस्ता, गांधारी पुलाकडे जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे सावित्री मार्ग, श्री वीरेश्वर मंदिर परिसर आणि इतर गल्लोगल्ली असलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येतात. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजी चौकामध्ये देखील काँक्री0ट असताना खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे अद्याप न भरल्याने वाहनांचे आपटून नुकसान होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Pen News : दीड फुटाची संरक्षक भिंत कसा जीव वाचवणार?

यापूर्वी देखील या रस्त्यांवर अशीच अवस्था होती. त्यावर उपाय म्हणून महाड नगर परिषद कायम जर्मन टेक्नॉलॉजी वापरत काँक्रिट रस्त्यावर डांबरी पॅच मारून लाखो रुपयांची उधळण करत आहे. यावेळी देखील तज्ज्ञ अभियंतांनी असेच तंत्रज्ञान वापरून काँक्रिट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे भरण्याची निविदा काढली. श्री वीरेश्वर मंदिर ते आयटीआय या परिसरात खड्डे भरण्याचे काम झाले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर देखील खड्डे भरले गेले. मात्र हे खड्डे भरत असताना खड्ड्यांपेक्षा उंचवटे जास्त झाले.

या उंचावट्यांमुळे ठिकठिकाणी गतिरोधक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याविरोधात तक्रारी आल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याचे समजते. या मंदावलेल्या कामामुळे लोकांचे हाल आणि वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासमोर देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

अधिकारी याच रस्त्यांवरून जात असले तरी या पडलेल्या खड्ड्यांचे आणि भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी तयार झालेल्या उंचवट्यांचे त्यांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाडकरांच्या हितासाठी खड्डे भरण्याच्या कामाला आतातरी वेग मिळणार का, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -