घररायगडPen News : दीड फुटाची संरक्षक भिंत कसा जीव वाचवणार?

Pen News : दीड फुटाची संरक्षक भिंत कसा जीव वाचवणार?

Subscribe

पेणजवळील ओव्हरब्रिजची संरक्षक भिंत कमी उंचीची असल्यामुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. म्हणूनच या संरक्षक भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणी होते आहे.

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळ बांधलेला ओव्हरब्रिज चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. विशेषता रात्रीच्या वेळी वाहनचालकांना या पुलाची प्रचंड भीती वाटते. याचे मुख्य कारण आहे ते या पुलाच्या संरक्षक भिंतीचे. या ओव्हरब्रिजच्या संरक्षक भिंतीची उंची केवळ दीड फूट आहे. त्यामुळे या संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम 15 वर्षांपासून सुरूच आहे. हे काम कधी पूर्ण होईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच पेणजवळ एक जीवघेणा प्रकार उघडकीस आला आहे. या महामार्गाच्या ओव्हरब्रिजची संरक्षक भिंत केवळ दीड फूट उंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी उंचीच्या संरक्षक भिंतीमुळे अपघात होऊन जीवितहानी हानीची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या भिंतीची उंची वाढवण्याची मागणी पेण तालुक्यातील शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad District News : रायगड जिल्हात ‘जलजीवन’च्या ‘गारंटी’चे तीन तेरा

सुरुवातीला डांबरीकरण केलेल्या ओव्हरब्रिजवरील रस्त्याचे आता सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सिमेंट काँक्रिटीकरणात रस्त्याची उंची वाढली आणि संरक्षक भिंतीची उंची घटली. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याकडे लक्ष वेधले जात आहे. ओव्हरब्रिजवरून वेगाने धावणाऱ्या गाड्या साईटपट्टी सोडून गेल्या तर ब्रिजवर असणाऱ्या कमी उंचीच्या संरक्षक भिंतीवरून कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झी गार्डनच्या भागात अशा प्रकारची दुर्घटना घडली होती.

- Advertisement -

हेही वाचा… Rohit Pawar vs Tatkare : मी पुराव्यासह बोलतो आणि…, रोहित पवारांचा तटकरेंना थेट इशारा

याच ठिकाणी शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही ही बाब धोकादायक आहे. त्यामुळेच दीड फुटाच्या संरक्षक भिंतीची उंची साडेतीन फुटांपर्यंत वाढवावी, अशी मागणी शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास नागरिक म्हणून जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णु पाटील यांनी दिला आहे. तर पेण विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे आणि शिववाहतूक सेना रायगड जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील यांनी देखील या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे.

यावेळी महामार्गावर डॉ. महेश पोरे (शिववाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), अच्युत पाटील (रायगड जिल्हाध्यक्ष), उत्तम वाघ (जिल्हा कार्याध्यक्ष), विनायक बेलोसकर (जिल्हा संघटक), नरेश सोनावणे (पेण तालुका अध्यक्ष), इम्रान बेमजी (पेण शहराध्यक्ष) हेदेखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -