घररायगडपुन्हा रायगडमध्ये येण्यासाठी निधी चौधरींचे प्रयत्न

पुन्हा रायगडमध्ये येण्यासाठी निधी चौधरींचे प्रयत्न

Subscribe

अजोय मेहतांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग

माहिती आणि तंत्रज्ञान विभागात नुकतीच बदली झालेल्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी पुन्हा जिल्ह्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता कामाला लागले असून, तोपर्यंत नवीन पदाचा चार्ज न घेण्याचा सल्ला चौधरी यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. याच कारणास्तव रायगडच्या जिल्हाधिकारी पदाचा अधिभार नवे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी घेतला नसल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री स्तरावर यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाल्याची माहिती आहे.

निधी चौधरी यांची नुकतीच रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संचालक या तुलनेने अगदी नगण्य असलेल्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांशी निधी चौधरी यांनी जमवून घेतले नाही. यात जसे सत्ताधारी नेते होते तसे विरोधी पक्षाचेही पदाधिकारी होते. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे त्यांच्याशी कमालीचे वैर होते. तटकरे या नवख्या मंत्री असल्याने चौधरी त्यांना फारशी किंमत देत नसल्याची जिल्ह्यात चर्चा होती. नियोजन मंडळाच्या मे महिन्यात पार पडलेलया बैठकीत निधी वाटपाच्या कारणावरून या दोघींचे भांडण इतके विकोपाला गेले की इतर आमदारांना मध्यस्थी करून तो वाद मिटवावा लागला.

- Advertisement -

यातूनच जिल्ह्याचे खासदार असलेल्या सुनील तटकरे यांच्याशी निधी चौधरी यांचे पटत नव्हते. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमक्षच चौधरी यांच्यावर एकच भडीमार केला होता. महाडच्या पुरात सारेमिळून काम करत असताना मंत्र्यांना डावलून चौधरी यांनी परस्पर पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा लावला होता. यासाठी त्या महाड सोडून अलिबागला येत असल्याच्या तक्रारी होत्या. जिल्हाधिकार्‍यांच्या या कार्यप्रणालीमुळे महाडमध्ये व्यस्त असलेले सगळेच नेते नाराज होते.

आपल्या अचानक झालेल्या बदलीमुळे चौधरी नाराज झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा रायगडमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू केला असून, यासाठी त्यांनी दिल्लीतून प्रयत्नांना सुरुवात केली आहे. राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेले मुख्यमंत्री कार्यालयाचे सल्लागार अजोय मेहता यांचे निधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. रायगडमध्ये पुन्हा येण्यासाठी निधी यांनी मेहतांची मदत घेतली आहे. सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच बदली झालेल्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संचालक पदाची त्यांनी अजून जबाबदारी स्वीकारली नाही. इतकेच नव्हे तर रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले महेंद्र कल्याणकर यांनाही पदभार स्वीकारण्यापासून अलिप्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे. थेट मुख्यमंत्र्यांकरवी निधी पुन्हा रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून दाखल करून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर जोरदार लॉबिंग सुरू आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -