Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

Related Story

- Advertisement -

रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.येथील रेल्वे पोलिसांना गेल्या सोमवारी नियंत्रण कक्षातून पळसदरी ते खडांळा या घाटातील रेल्वे ट्रॅकशेजारी महिला जखमी होऊन निपचित पडल्याचा संदेश मिळताच निरिक्षक अविनाश आधंळे यांनी उपनिरीक्षक सरकाळे, जीआरपी, आरपीएफ कर्मचारी आणि होमगार्ड यांना घटनास्थळी रवाना केले. सुरुवातील हे सर्वजण पळसदरी स्टेशनपर्यंत गेले. परंतु तेथून घाट सुरू होत असल्याने रेल्वे ट्रॅक व्यतिरिक्त वाहनाचा रस्ता नसल्यामुळे रस्ता मार्गाने खोपोली-कर्जत रेल्वे मार्गावरील केळवली स्टेशन गाठून तेथून पायपिट करीत डोंगराळ भागातील रेल्वे ट्रॅक गाठला.

तेथून लोणावळा दिशेला साधारण चार किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर एक आदिवासी महिला बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आली. पुणे-मुंबई लोहमार्गावरील कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या घाट रस्त्याच्या जवळपास गाव किवा वस्ती नसल्यामुळे जखमी महिलेला उपचारासाठी इतरत्र हलविणे आव्हान होते. ही पुणे रेल्वे पोलिसांची हद्द असल्याने वरिष्ठांना कळवून केळवली स्टेशनपर्यंत रुग्णवाहिका मागविण्यात आली. महिलेला नेण्यासाठी पोलिसांनी झोळीचा वापर केला आणि पुन्हा ४ किलोमीटरची पायपीट करून तिला रुग्णवाहिकेपर्यंत आणून तेथून येथील उप जिल्हा रुग्णालयात पोहचविले.

- Advertisement -

या जखमी महिलेचे नाव आशा वाघमारे (42, रा. कार्ला-ईरगाव, ता. मावळ, जि. पुणे) असेे असून, ती लाकडे गोळा करीत असते. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात तिचा ताबा लोणावळा जीआरपीकडे देण्यात आला. उपनिरीक्षक सरकाळे यांच्या पथकात शिपाई निकेश तुरडे, शिपाई मंगेश गायकवाड, नाईक ज्ञानेश्वर गांगुर्डे, कोंडिराम बनसोडे, होमगार्ड व्ही. डी. लोभी यांचा समावेश होता. पोलिसांच्या या कर्तव्य तत्परतेचे कौतुक होत आहे.

- Advertisement -