घररायगडउरणमध्ये जेएनपीएने ३२ कोटी खर्चिलेल्या शिव समर्थ स्मारकाकडे दर्शकांची पाठ

उरणमध्ये जेएनपीएने ३२ कोटी खर्चिलेल्या शिव समर्थ स्मारकाकडे दर्शकांची पाठ

Subscribe

रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राची शान ठरू पाहाणार्‍या उरण येथे जेएनपीएने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बहुचर्चित मेमोरियल म्युझियम ठरलेल्या २० मीटर उंचीच्या शिव समर्थ स्मारकाचे पाच वर्षांपूर्वी लोकार्पण झाले आहे. ३२ कोटी खर्चून उभारलेल्या या भव्य- दिव्य शिवस्मारकामध्ये मनोरंजनासह विविध अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.मात्र त्यानंतरही देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांनी या शिवस्मारकाकडे पाठ फिरवली आहे. मात्र हे शिवस्मारक उत्पन्नाचे साधन म्हणून उभारण्यात आले नसल्याचे जेएनपीए प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रचार,प्रसार करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. तरीही शिवस्मारकाच्या देखभालीवर दोन वर्षाआड चार कोटींहून अधिक रुपये खर्च केला जात आहे.

उरण: सुभाष कडू

रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राची शान ठरू पाहाणार्‍या उरण येथे जेएनपीएने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बहुचर्चित मेमोरियल म्युझियम ठरलेल्या २० मीटर उंचीच्या शिव समर्थ स्मारकाचे पाच वर्षांपूर्वी लोकार्पण झाले आहे. ३२ कोटी खर्चून उभारलेल्या या भव्य- दिव्य शिवस्मारकामध्ये मनोरंजनासह विविध अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.मात्र त्यानंतरही देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांनी या शिवस्मारकाकडे पाठ फिरवली आहे. मात्र हे शिवस्मारक उत्पन्नाचे साधन म्हणून उभारण्यात आले नसल्याचे जेएनपीए प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रचार,प्रसार करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. तरीही शिवस्मारकाच्या देखभालीवर दोन वर्षाआड चार कोटींहून अधिक रुपये खर्च केला जात आहे.
उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात जेएनपीटीने ३२ कोटी खर्चुन २० मीटर उंचीचे भव्य शिव समर्थ स्मारक उभारले आहे. पाच मजले उंचीपर्यंत उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या तळ मजल्यावर ४८० चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे.या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरुम आणि संग्रहालयाचाही समावेश आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असुन या बाल्कनीमधुन चहुबाजूंनी असलेल्या निसर्गमय परिसर न्याहाळता येत आहे.दुसर्‍या मजल्यावर भव्य अशा प्रदर्शन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे.
या प्रदर्शन हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यामुळे कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या स्वांतत्रवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगावर आधारित अप्रतिम शिल्प उभारण्यात आले आहे. तसेच यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे तारणहार झुंजार लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचेही लढ्याच्या प्रसंगावर आधारित चित्रही लावण्यात आले आहे. तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर चहुबाजूंनी परिसरातील देखाव्यांची लज्जत घेण्यासाठी विह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर तयार करण्यात आलेल्या ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. या ऑडिओ व्हिज्युअल मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे.या खुल्या एमपी थिएटरमध्ये २५० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.पाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातुंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमजल्यापासुन उंची १९.३ मीटर आहे.राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक आहे.

- Advertisement -

देखभालीवर चार कोटी रुपये खर्च
१७ फेब्रुवारी २०१९ रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाखो शिवप्रेमी व दासभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवस्मारक बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर पुन्हा सर्वांसाठी नाममात्र १० रुपये तिकिटावर खुले करण्यात आले आहे.मात्र मागील दोन वर्षांत शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिक या शिवस्मारकाकडे फारसे फिरकलेच नसल्याचे दिसून येत आहे.जेएनपीए प्रशासनाकडूनही शिवस्मारकाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जेएनपीए मात्र दर दोन वर्षाआड शिव समर्थ स्मारकाच्या देखभालीवर चार कोटी रुपये खर्च करीत आहे.

देखभालीसाठी २२ सुरक्षारक्षकांसह ५२ कर्मचारी
देखभालीसाठी २२ सुरक्षारक्षकांसह गाईड आणि एकूण ५२ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.या कामासाठी ठेकेदाराचीही नियुक्ती केली आहे. देखभालीवर दोन वर्षाआड चार कोटींहून अधिक खर्च करीत आहे.सात महिन्यांपूर्वीच ३ कोटी ९७ लाख ७४ हजार खर्चाच्या कामाचे एप्रिल २०२४ पर्यंत देखभालीच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.मागील चार वर्षात प्रशासनाने ३२ कोटींच्या शिव समर्थ स्मारकाच्या देखभालीवरच आठ कोटींहून अधिक खर्च केले आहेत.यामुळे शिवस्मारक उभारण्यामागे जेएनपीएचा नेमक्या हेतुबाबतच शंका व्यक्त केली जात आहे.त्यामुळे जेएनपीएवर पांढरा हत्ती पोसण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचीच चर्चा अधिकारी, कामगारांमध्ये सुरू झाली आहे.

- Advertisement -

प्रचार, प्रसार करण्यात प्रशासन कमी पडले
शिव समर्थ स्मारक नफा कमाविण्यासाठी अथवा उत्पन्नाचे साधन म्हणून उभारण्यात आलेले नाही. तर देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांना शिवमहिमा ज्ञात करुन देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शिवस्मारक पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.शिवस्मारकाचा प्रचार, प्रसार करण्यात प्रशासन कमी पडले आहे.आता मात्र शिवस्मारकाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि शिक्षण विभागाला पत्र देऊन प्रचार,प्रसार करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. अशी माहिती जेएनपीएचे प्रशासनाचे मुख्य प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -