मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे तरुणीला जीवनदान

एका १८ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक दाबून मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी या तरुणीचा जीव वाचवल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली

 

नवी मुंबई: पनवेल-वाशी-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या रेल्वेखाली येत एका १८ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक दाबून मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी या तरुणीचा जीव वाचवल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी पनवेल – सीएसएमटी ही लोकल ट्रेन दुपारी २.०७ च्या सुमारास वाशी स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघत होती. त्यानंतर एक १८-१९ वर्षांची तरूणी सुरुवातीला रेल्वे रूळ ओलांडण्याचा बहाण्याने अचानक रेल्वे रुळांवर आडवी झोपली. मोटरमन प्रशांत कोन्नूर यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेकचा वापर केला. काहीसा वेग घेतलेली लोकल तात्काळ थांबली असली तरी तरुणी मात्र थोडक्यात बचावली. कारण ब्रेक दाबल्यानंतर मोटरमन कोन्नूर यांनी खाली उतरून पहिले असता ती तरुणी रेलगार्ड आणि चाकाच्या मधोमध असल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने आपत्कालीन ब्रेकमुळे ट्रेन सुरक्षितपणे तरुणीच्या जवळ थांबली. कोन्नूर यांनी त्या मुलीला सुखरूप रेल्वे रूळांवरून बाहेर काढत तरुणीची चौकशी केली असता ती तरुणी तुर्भे येथे राहत असून आत्महत्या करण्याच्या विचाराने ट्रॅकवर आली होती हे उघड झाले. वेळ न दवडता मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी तीला धीर देऊन त्याच गाडीतील पहिल्या महीला डब्ब्यात बसवले. डब्ब्यातील इतर महीलांना तीची काळजी घेण्यास सांगून त्यांनी पुन्हा गाडी सुरू केली. मानखुर्द रेल्वे स्थानकात रेल्वे आली असता मोटरमननी पुन्हा तीची विचारपूस करून तीला सुखरूप घरी जाण्यासाठी समजावले.

आम्ही कोणत्याही मेडल अथवा कौतुकासाठी काम करत नाही. प्रवाशांची सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे. मात्र मंगळवारी घडलेला प्रकार खूप भयानक होता. माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत चटकन तरुणी रेल्वे रुळांवर झोपली. मात्र काहीही असले तरी तो एक जीव आहे वाचलाच पाहिजे. याच दृष्टीने मी माझी सर्व ताकद पणाला लावत आपत्कालीन ब्रेक मारला. मनात नकारात्मक विचार आणत जीवन संपवण्याचा प्रयत्न करू नये मी एवढेच या घटनेबाबत सांगेन.
– प्रशांत कोन्नूर,
मोटरमन, पनवेल मुख्यालय