घरक्रीडाबेल्स आऊट?

बेल्स आऊट?

Subscribe

क्रिकेटमध्ये बॅट, चेंडू, स्टम्प्स, बेल्स यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्ल्डकपमध्ये सध्या बेल्सवरून वाद-विवाद सुरू आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहचा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरच्या बॅटच्या आतील कडेला लागून स्टम्पवर आदळला, परंतु बेल्स जागच्याजागीच राहिल्यामुळे वॉर्नर बचावला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ‘झिंग’ बेल्सचा वापर करण्यात येत असून, ‘बेल्स’ न पडल्याचा प्रकार एक, दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा घडला आहे.

वॉर्नरसह दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने, विंडीजचा क्रिस गेल, बांगलादेशचा मोहम्मद सैफुद्दीन हे पाच फलंदाज सुदैवी ठरले. स्टम्पवर बेल्स ठेवाव्यात की नाही, याबाबत सध्या वाद-विवाद रंगत आहेत.

- Advertisement -

क्रिकेटमधील अ‍ॅशेसची कहाणी मनोरंजक आहे. अ‍ॅशेसचा जन्म झाला तो बेल्स जाळल्यामुळे. ओव्हल कसोटी केवळ दोन दिवसांतच गमावल्यामुळे यजमान इंग्लंडचे पाठीराखे वैतागले. त्यांनी बेल्स जाळून त्या एका पात्रात (अर्न) ठेवल्या. ‘अ‍ॅशेस’ या नावाने प्रसिद्ध असलेली अर्न लॉर्ड्सवरील क्रिकेट म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज सामन्यात मिचेल स्टार्कचा चेंडू क्रिस गेलला चकवून स्टम्पला लागून गेला, परंतु बेल्स पडल्या नाहीत. गेलला याचा फायदा उठवता आला नाही आणि कांगारूंनी हा सामना जिंकत २ गुण पटकावले. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसेन यांच्या मते असे प्रकार वारंवार घडणे उचित नाही. गोलंदाजांचे सध्या काही खरे नाही. यात बदल व्हायला हवा, असे हुसेनला वाटते.

- Advertisement -

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो, हे काय चाललंय? माझ्या हयातीत मी असे घडताना पाहिलेले नाही, परंतु वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गेल्या दहा दिवसात हे पाचवेळा घडले! ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच म्हणतो, कुठल्याही संघाला ही बाब रुचणार नाही. गोलंदाज जीव तोडून चांगला चेंडू टाकतात, पण फलंदाज काही बाद दिला जात नाही. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या मते स्टम्प्स घट्टपणे रोवायला हवेत, परंतु तसे करण्यात आले नव्हते.

आयपीएल तसेच ऑस्ट्रेलियामधील ‘बिग बॅश’ स्पर्धेत असे प्रकार याआधी घडले आहेत. याकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने लक्ष वेधले. काही जाणकारांच्या मते बेल्स शिवाय सामने खेळवले जावेत, तर काहींच्या मते बेल्स आवश्यक आहेत. खासकरून फलंदाजांना यष्टिचित करताना यष्टीरक्षक बेल्स प्रथम उडवतो, फलंदाजांना धावचीत करताना काही वेळा बेल्सच उडवल्या जातात. जोराच्या वार्‍यामुळे जर बेल्स उडत असतील, तर पंच बेल्सविना खेळायची परवानगी देतात. कारण बेल्स वार्‍यामुळे पडू लागल्या, तर खेळात वारंवार व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे खेळाचा वेळही वाया जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी पंच बेल्सशिवाय खेळण्याची परवानगी देतात.

इंग्लंडमधील एका सामन्यात मजेशीर घटना घडली. लाकडी बेल्सला वॉर्निश लावले असल्यामुळे कडक उन्हात वॉर्निश वितळले आणि बेल्स स्टम्प्सवरील खाचेत घट्ट रुतून बसल्यामुळे त्या पडल्या नाहीत. २-३ वेळा असा प्रकार घडल्यावर पंचांनी पाहणी केली असता बेल्स स्टम्पला चिकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नवीन स्टम्प्स, बेल्स वापरून पुन्हा खेळाला सुरुवात झाली.

क्रिकेटमध्ये परंपरांना महत्त्व असल्याने त्यात फारसे बदल सहसा केले जात नाहीत. अलीकडे मते लालऐवजी नारिंगी, गुलाबी रंगांचे चेंडू वापरण्याचे प्रयोग कसोटी क्रिकेटमध्ये करण्यात येत आहेत, तेदेखील विद्युत झोतात दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी. वनडे क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले असून, दोन एंडकडून दोन वेगवेगळ्या पांढर्‍या रंगाच्या चेंडूंचा वापर करण्यात येतो. नाणेफेकीला क्रिकेटमध्ये एक वेगळेच महत्त्व आहे.

यजमान संघ आपल्याला अनुकूल खेळपट्ट्या बनवू लागल्यामुळे नाणेफेक रद्द करावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु पुरेशा पाठिंब्याअभावी तो बारगळला. बेल्सशिवाय क्रिकेट हा विचार करणे कठीण दिसते. परंपराप्रिय क्रिकेटमध्ये बेल्सचे स्थान अबाधित राहील!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -