घरक्रीडाजेव्हा ‘छोटे’ पडतात मोठ्यांवर भारी

जेव्हा ‘छोटे’ पडतात मोठ्यांवर भारी

Subscribe

क्रिकेट विश्वचषक आणि धक्कादायक निकाल हे समीकरण फार जुनेच आहे. जे संघ ‘छोटे’ मानले जातात, तेही विश्वचषकात आपला खेळ उंचावत मोठ्या संघांना चांगली झुंज देतात. बांगलादेश हा संघ अजून बलाढ्य म्हणून ओळखला जात नाही. मात्र, त्यांनी वेळोवेळी अव्वल संघांना पराभूत करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात बांगलादेशने दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाचा धक्का दिला. मागील एका दशकात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने सुधारणा केलेला संघ म्हणजे बांगलादेश असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे हा संघ यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, हा संघ आपल्या पहिल्याच सामन्यात, तेही दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारून सामना जिंकेल हे अपेक्षित नव्हते. त्यांनी या विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आणि ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. १९७५ साली सुरू झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात एखाद्या तुलनेने छोट्या संघाने मोठ्या संघाला पराभूत करण्याची पहिली वेळ नव्हती.

- Advertisement -

वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकात याच बांगलादेशने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग अशा अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला पराभूत करत क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या सामन्यात सध्याचा कर्णधार मश्रफी मुर्तझाच्या ४ विकेटमुळे भारताचा डाव अवघ्या १९१ धावांत संपुष्टात आला आणि युवा तमिम, मुशफिकूर रहीम, शाकिब यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने १९२ धावांचे लक्ष्य ४९व्या षटकात गाठत हा सामना जिंकला.

त्याआधी १९८३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पहिले दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. त्यामुळे विंडीजच हा सामना जिंकत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करेल, अशी अपेक्षा होती. त्यातच अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग यांच्या तेजतर्रार मार्‍यामुळे भारताचा डाव अवघ्या १८३ धावांतच आटोपल्यामुळे विंडीजची हा सामना जिंकण्याची शक्यता अधिकच बळावली होती. मात्र, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ यांच्या भेदक मार्‍यामुळे वेस्ट इंडिजचा डाव १४० धावांत संपुष्टात आला आणि भारताने अनपेक्षितरित्या हा सामना जिंकत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

- Advertisement -

१९८३ मध्येच आपला पहिला विश्वचषक खेळणार्‍या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. झिम्बाब्वेने १९९२ विश्वचषकात ग्रॅहम गुचच्या इंग्लंडला धूळ चारली होती. १९९६ मध्ये विश्वचषकात आपले पदार्पण करणार्‍या केनिया संघाने लारा, चंद्रपॉल, कर्टली अँब्रोस, वॉल्श अशा खेळाडूंचा समावेश असलेल्या वेस्ट इंडिजचा ७३ धावांनी पराभव केला होता. १९९९ विश्वचषकात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्याचप्रमाणे आयर्लंडने २००७ विश्वचषकात पाकिस्तानवर, तर २०११ विश्वचषकात इंग्लंडवर मात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

यंदाच्या विश्वचषकात जगातील अव्वल दहा संघच सहभागी झाल्याने छोटे विरुद्ध मोठे असे फारसे सामने पहायला मिळणार नाहीत. मात्र, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या संघांकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे हे संघ तुलनेने बलाढ्य संघांचा पराभव करण्यास उत्सुक असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -