घरक्रीडाडेव्हिस टेनिस चषक; युकी, रामनाथन विजयी

डेव्हिस टेनिस चषक; युकी, रामनाथन विजयी

Subscribe

भारताला २-० अशी आघाडी

नवी दिल्ली : रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरी यानी आपल्या एकेरीच्या लढतीत सफाईदार विजय मिळवून यजमान भारतीय संघाला डेव्हिस चषक जागतिक गटाच्या प्ले ऑफ लढतीत डेन्मार्कविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. दिल्ली जिमखान्याच्या ग्रास कोर्ट भारतीय संघ २-० ने आघाडी घेईल, अशी अटकळ होती. ग्रास कोर्ट डॅनिश खेळाडूची डाळ शिजली नाही. जलद आणि लो बाउन्स असणाऱ्या कोर्टचा रामकुमार आणि युकी यांनी पुरेपूर फायदा उठवून कर्णधार रोहित राजपालचे आडाखे अचूक असल्याचे दाखवून दिले.

सलामीच्या लढतीत रामकुमार रामनाथनने डेन्मार्कच्या क्रिस्तीयन सिग्जगार्डचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये तासाभरातच पराभव केला. तेव्हा दिल्ली जिमखान्यावर हजेरी लावणाऱ्या अडीच हजाराहून दिल्लीकर टेनिस चाहत्यांनी उंचपुऱ्या रामकुमारचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रोहित राजपाल आणि विजय अमृतराज यांनी कौतुक केले.

- Advertisement -

ग्रासकोर्टवर खेळण्याचा लाखमोलाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मी खेळावर लक्ष केंद्रित केले. माझ्या क्षमतेनुसार खेळ केला, असे रामकुमार रामनाथनने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्याची सर्विस भन्नाट होती. शिवाय नेटजवळ जात त्याने सुंदर खेळ करत जाणकारांसह माजी बुजूर्ग खेळाडूंकडून शाबासकी मिळवली. जयदीप मुखर्जी, जसजीत सिंग, नंदन बाळ प्रभुतींचा समावेश होता.

दुखापतीनंतर युकी भांबरी डेव्हिस चषक स्पर्धेत खेळत असला तरी त्याने अलीकडेच पुण्यातील स्पर्धेत जेतेपद पटकावले असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावल्याचे शुक्रवारच्या खेळातून जाणवले. शिवाय कर्णधार रोहित राजपालचा भरवसा त्याच्यावर होता. ती जाणीव ठेवून खेळताना युकीने सामन्यात सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी डॅनिश खेळाडूची सर्विस मोडून काढत दिमाखदार खेळ केला. पहिला सेट युकीने ६-४ असा ५१ मिनिटात जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ४-० अशी मोठी आघाडी घेतली. तेव्हा सामना झटपट संपतो, असे वाटत असतानाच डॅनिश खेळाडू मायकेल टॉर्पे गार्डने आपला खेळ उंचावत युकीची सर्विस भेदली. सामन्यात चुरस निर्माण झाली. गेम लांबत गेले. पण युकीने आपला सारा अनुभव पणाला लावून अखेरीस ६-४ असा दुसरा सेट जिंकून बाजी मारली. भारताने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले.

- Advertisement -

शनिवारी दुहेरीच्या लढतीत भारतीय संघात बदल होण्याचे संकेत आहेत. अनुभवी रोहन बोपन्नाच्या साथीने दिवीज शरणच्या नावाची घोषणा ड्रॉच्या वेळी करण्यात आली असली तरी स्पर्धेच्या नियमानुसार आयत्या वेळी संघात बदल करण्याची मुभा असते. त्यानुसार दिवीजऐवजी रामकुमार रामनाथन दुहेरीत रोहन बोपन्नाच्या साथीने उतरण्याशी शक्यता आहे. पण कर्णधार रोहित राजपालने सांगितले की, याबाबतचा निर्णय संघ सहकाऱ्याबरोबर होणाऱ्या बैठकीनंतरच घेण्यात येईल. २-० आघाडी मिळाल्यामुळे राजपाल खूष होता. त्याने रामकुमार आणि युकी यांच्यावर विश्वास दर्शवला. तो त्यांनी सार्थ ठरवून आपली भूमिका चोखपणे पार पाडली.

सामन्याचे निकाल 

भारत २ विरुद्ध डेन्मार्क ०

१. रामकुमार रामनाथन विजयी वि. क्रिस्तीयन सिग्जगार्ड (६-३, ६-२)

२. युकी भांबरी विजयी वि. मायकेल टॉर्पेगार्ड (६-४, ६-४)


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -