घरक्रीडात्या चार धावा नको, असे म्हणालो नाही! -स्टोक्सची कबुली

त्या चार धावा नको, असे म्हणालो नाही! -स्टोक्सची कबुली

Subscribe

यजमान इंग्लंडने अंतिम सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकारांच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतर दोन संघांमध्ये बरोबरी असताना इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आल्याने आयसीसीवर टीकेची झोड उठली. त्यातच नियमित सामन्याच्या अखेरच्या षटकात इंग्लंडचा बेन स्टोक्स २ धावांच्या प्रयत्नात असताना मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू अनाहूतपणे स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषा पार गेला. त्यामुळे इंग्लंडला दोन धावांसह अतिरिक्त चार धावा मिळाल्या.

ओव्हर-थ्रोच्या या नियमामुळेही आयसीसीवर टीका झाली. स्टोक्सवर मात्र टीका होऊ नये यासाठी त्याचा कसोटी संघातील सहकारी जिमी अँडरसनने त्याची बाजू घेतली होती. त्या चार धावा ग्राह्य धरू नये, अशी विनंती स्टोक्सने पंचांना केली होती, असे अँडरसन म्हणाला. पण आता ही गोष्ट स्वतः स्टोक्सनेच नाकारली आहे. तो चौकार नको, असे मी पंचांना म्हणालो नाही, असे स्टोक्सने कबूल केले.

- Advertisement -

अगदी खरे सांगायचे तर मी पंचांना त्या चार धावा ग्राह्य धरू नये, असे म्हणाल्याचे मला आठवत नाही. मी थेट (यष्टीरक्षक) टॉम लेथमजवळ गेलो आणि त्याची माफी मागितली. त्यानंतर मी (न्यूझीलंडचा कर्णधार) विल्यमसनकडे बघून त्याचीही क्षमा मागितली. सामन्यानंतरही मी विल्यमसनशी बोललो. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मी पंचांना त्या चार धावा नको असे म्हणालो नाही, असे स्टोक्स म्हणाला.

गप्टिलने फेकलेला चेंडू उडी मारणार्‍या स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषा पार गेल्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी मैदानातील दुसरे पंच मरे इरॅस्मस आणि इतर पंचांशी चर्चा करून इंग्लंडला एकूण सहा धावा दिल्या. मात्र, क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, त्यावेळी दुसरी धाव घेताना फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले नव्हते. त्यामुळे पंचांनी ६ नाही, तर ५ धावाच दिल्या पाहिजे होत्या, असे माजी पंच सायमन टॉफल म्हणाले होते. धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली, परंतु मला त्या निर्णयाचा खेद नाही, असेही धर्मसेना म्हणाले होते.

- Advertisement -

अ‍ॅशेसमध्ये वॉर्नरपासून सावधान

गुरुवारपासून सुरु होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरपासून सावधान राहावे लागेल, असे मत बेन स्टोक्सने व्यक्त केले. वॉर्नर कोणत्याही क्षणी सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवू शकतो. तो खूपच उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याला रोखणे अवघड आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. त्याला आणि ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना सुरुवातीपासून योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे आवश्यक आहे. आम्ही या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करू अशी मला आशा आहे. आम्हाला अर्न परत मिळवायचा आहे, असे स्टोक्सने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -