घरक्रीडा'वाडा'ने घातली रशियावर चार वर्षांची बंदी

‘वाडा’ने घातली रशियावर चार वर्षांची बंदी

Subscribe

डोपिंगबाबत चुकीचा तपशील दिल्याने वाडाची कारवाई

जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (वाडा) सोमवारी रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या बंदीमुळे पुढील चार वर्षे रशियाला ऑलिम्पिक आणि इतर मोठ्या जागतिक स्पर्धांत खेळता येणार नाही. पुढील चार वर्षांत टोकियो ऑलिम्पिक (२०२०), बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक (२०२२) आणि फुटबॉल विश्वचषक (२०२२) या मोठ्या स्पर्धा होणार असून या स्पर्धांना रशियाला मुकावे लागेल.

डोपिंगबाबत एका लॅबमधून चुकीचा तपशील देण्यात आल्यामुळे वाडाने रशियावर बंदी घातली. स्वित्झर्लंडला झालेल्या वाडाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ज्या शिफारशी करण्यात आल्या होत्या त्या सर्वसमंतीने स्वीकारण्यात आल्या आहेत, असे वाडाने स्पष्ट केले. रशिया मागील काही वर्षांत खेळांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, २०१५ पासून ते डोपिंगच्या विविध प्रकरणांत अडकत आहेत. २०१५ मध्ये रशियाच्या बर्‍याच खेळाडूंनी मिळून उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याचे वाडाला आढळले होते.

- Advertisement -

आता रशियावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली असली तरी डोपिंग चाचणीत ज्या रशियन खेळाडूंना क्लीन चिट मिळेल, ते खेळाडू तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग होऊ शकतील. तसेच वाडाच्या या निर्णयाला रशिया पुढील २१ दिवसांच्या आत आव्हान देऊ शकते. रशियाने या निर्णयास आव्हान दिल्यास या प्रकरणावर स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -