घरक्रीडाHockey World Cup 2018 : बलाढ्य बेल्जियमला भारताने झुंजवले

Hockey World Cup 2018 : बलाढ्य बेल्जियमला भारताने झुंजवले

Subscribe

बेल्जियम आणि भारताचा हॉकी विश्वचषकातील सामना २-२ बरोबरीत संपला.

सामना संपायला अवघी ४ मिनिटे बाकी असताना सिमोन गौगनार्डने केलेल्या गोलमुळे बेल्जियम आणि भारताचा हॉकी विश्वचषकातील सामना २-२ बरोबरीत संपला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या बेल्जियमचे या सामन्यात पारडे जड मानले जात होते. पण भारताच्या खेळाडूंनी घरच्या प्रेक्षकांसमोर बेल्जियमला अप्रतिम झुंज दिली. त्यामुळे पूल ‘क’ मधील हा सामना बरोबरीत संपला. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि सिमरनजीत सिंग तर बेल्जियमकडून अॅलेक्सांडर हॅन्ड्रिक्स आणि सिमोन गौगनार्ड यांनी गोल केले.

मध्यंतरापर्यंत बेल्जियमला आघाडी

या सामन्याच्या पहिल्या सत्रात अपेक्षेनुसार बेल्जियमने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांना दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमच्या खेळाडूने मारलेला फटका भारताचा गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिमरीत्या अडवला. त्यांनी पुढेही आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. याचा फायदा त्यांना ८ व्या मिनिटाला झाला. अॅलेक्सांडर हॅन्ड्रिक्सने मैदानी गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने चांगला खेळ करण्यास सुरुवात केली. पण त्यांना बेल्जियमची भक्कम बचावफळी भेदता आली नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत बेल्जियमने आपली १-० आघाडी कायम ठेवली.

भारताचे आक्रमण 

तिसऱ्या सत्रात भारताने चांगली सुरुवात केली. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर वरूण कुमारने मारलेला फटका गोलमध्ये उभ्या असलेल्या बेल्जियमच्या आर्थर डी स्लोव्हरच्या अंगाला लागला. त्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या पेनल्टी स्ट्रोकचा फायदा घेत हरमनप्रीत सिंगने भारताला १-१ अशी बरोबरी करून दिली. तर चौथ्या सत्रातही भारताने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. याचा फायदा त्यांना ४७ व्या मिनिटाला मिळाला. सिमरनजीत सिंगने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हा सिमरनजीतचा या विश्वचषकाच्या दोन सामन्यांतील तिसरा गोल होता. भारत ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवणार असे वाटत असतानाच ५६ व्या मिनिटाला सिमोन गौगनार्डने गोल करत बेल्जियमला २-२ अशी बरोबरी करून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना २-२ असाच संपला.

भारताचा पुढील साखळी सामना कॅनडाविरुद्ध 

पूल ‘क’ मध्ये आता २ सामन्यांनंतर भारत आणि बेल्जियम या दोन्ही संघांच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. भारताचा पुढील साखळी सामना ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -