घरमनोरंजनदेशपांडेंचा ‘मॅक’

देशपांडेंचा ‘मॅक’

Subscribe

मकरंद देशपांडे अर्थात बॉलिवूडचा मॅक. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तो मराठी आहे हे सांगता येणं कठीण आहे. स्वत:चा लूक पूर्णपणे बदलून वावरणारा तो एक अभिनेता आहे. त्याची स्वत:ची विद्वत्ता लेखन, दिग्दर्शन, अभिनयातून त्याने दाखवून दिलेली आहे. मराठी रंगभूमीपासून अलिप्त असलेल्या मकरंद देशपांडेंशी साधलेला सुसंवाद.

नाट्य क्षेत्रात येणे कसे झाले?
मला वाटतं साधारण पंचवीस-तीस वर्षांपूर्वीसुद्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धेचे आकर्षण होते. आयएनटी, उन्मेष यासारख्या एकांकिका स्पर्धा त्यावेळी गाजत होत्या. डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्या एकांकिकेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. पहिल्या प्रयत्नात रंगमंचावर जो काही अविष्कार घडला तो थेट कौतुक करणारा ठरला. आयएनटीच्या व्यासपीठावर आपलं कसब दाखवणार्‍या बर्‍याचश्या कलाकारांना व्यावसायिक रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली होती, मला ती हिंदीत मिळाली. मग माझा सुसाट प्रवास सुरू झाला. आज जे स्टार आहेत त्यावेळी तेही माझ्या स्ट्रगलरच्या प्रवासाचे साक्षीदार होते.

पन्नास हिंदी नाटकं केल्यानंतर मराठी नाटकासाठी काम करावेसे का वाटले?
मी हिंदीत जरी वावरलो असलो तरी मराठी रंगभूमी हे माझे प्रेरणास्थान आहे. बरीचशी मराठी नाटके मी नजरेखालून घातलेली आहेत. हिंदी आणि मराठी नाटकांत बराचसा फरक आहे. मराठी रंगभूमीची गणितं ही आर्थिक उलाढालीवर अवलंबून आहेत. इथे सतत प्रयोग करण्याला महत्त्व देतात. ही धावपळ प्रत्येकाला जमेल असे नाही. हिंदीत मात्र ठरावीक वेळी नाटकाचे प्रयोग केले जातात, त्यामुळे मानसिक तयारी ही झालेली असते. अनेक वेळा मराठी रंगभूमीसाठी काही करावेसे वाटत होते. ‘एपिक गडबड’च्या निमित्ताने ती संधी चालून आलेली आहे. नाटकाचे निर्माते अभिजित साटम यांनी ती तयारी दाखवली. हीच संधी आहे असे समजून मीही त्याला होकार दिलेला आहे.

- Advertisement -

भविष्यात मराठी रंगमंचावर तू प्रत्यक्षात दिसणार आहेस का?
आता माझ्या दिग्दर्शनात जे नाटक चालू आहे, त्यात मी प्रत्यक्ष काम केलेले नाही. हिंदी रंगमंचावर मीच नाटक लिहिले आहे, दिग्दर्शित केलेले आहे त्यात बर्‍याच वेळा कामही केलेले आहे. पण का कोणास ठाऊक ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ हे माझे हिंदी नाटक मी मराठीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात माझी मुख्य भूमिका असेल. या नाटकाचे निदान पंचवीस प्रयोग मराठीत व्हावेत यादृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.

‘एपिक गडबड’बद्दल तू काय सांगशिल?
‘शेक्सपिअरचा म्हातारा’ या हिंदी नाटकातून प्रेरणा घेऊन ‘एपिक गडबड’ हे हिंदी नाटक मी लिहिले. त्याचे पंचवीस-तीस प्रयोगही केले. आशुतोष गोवारीकर, मनोज वाजपेयी, ओम प्रकाश मेहरा यांच्यासह अनेकांनी या नाटकाचे कौतुक केले. या हिंदी नाटकात माझ्यासह सर्वच कलाकार मराठी आहेत. ज्यांनी स्पर्धा गाजवली, त्यांना यात प्राधान्य दिलेले आहे. यात सहभागी असलेल्या सर्वच कलाकारांना रंगमंचाबद्दल आस्था आहे. त्यांचे या कलेशी अतूट नाते असल्यामुळे या नाटकाची जी गरज आहे ती पूर्णपणे ते भागवतात. इतिहासातील व्यक्तीरेखा घेऊन या नाटकाची कथा लिहिली गेलेली आहे. हिंदीत जेवढ्या मनोरंजकतेने ती पहायला मिळते तेवढीच ती मराठीतही पहायला मिळावी या एका इच्छेने ‘एपिक गडबड’ हे नाटक रंगमंचावर आणलेले आहे.

- Advertisement -

हिंदीत रूळण्याचे कारण काय?
ज्यावेळी या क्षेत्रात आलो, त्यावेळी कुठे, कसे काम करायचे हे ठरवले नव्हते. मराठी कलाकाराचे हिंदीत कौतुक होते हा अनुभव मला इथे आला आणि मी इथे गुंतत गेलो. ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘डरना जरूरी है’, ‘स्वदेश’, ‘कंपनी’, ‘सत्या’, ‘चमेली’, ‘मकडी’ असे काहीसे चित्रपटही माझ्या वाट्याला आले. त्याला कारण म्हणजे हिंदी रंगभूमीवरचा माझा वावर. इथे मला आनंद मिळतो. कामही मिळते. त्यामुळे बहुदा मी हिंदीत जास्त रूळलो गेलो. याचा अर्थ मराठीकडे मी दुर्लक्ष केले आहे असे म्हणता येणार नाही. ‘दगडी चाळ’, ‘ट्रकभर स्वप्न’, ‘पन्हाळा’ अशा कितीतरी मराठी चित्रपटांत मी काम केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -