IND vs NZ Test series : कोच राहुल द्रविडच्या पुढाकाराने खंडित परंपरा सुरू; सुनिल गावस्करांच्या हस्ते अय्यरला कॅप

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी अय्यरला कसोटी संघाची कॅप प्रदान करून त्याची पहिल्या सामन्यासाठी निवड केली

भारत आणि न्यूझीलंडमध्ये कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरचा कसोटी सामन्यांसाठी डेब्यू झाला आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी अय्यरला कसोटी संघाची कॅप प्रदान करून त्याची पहिल्या सामन्यासाठी निवड केली. दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघातील नव्या खेळांडूना कॅप प्रदान करण्याच्या जुन्या परंपरेला जिवंत करत पुन्हा एकदा ती परंपरा चालू केली आहे.

दरम्यान, भारताकडून कसोटी क्रिकेट मध्ये डेब्यू करणारा श्रेयस अय्यर ३०३ वा खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक होण्यापूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू गावस्करांनी त्याला कॅप प्रदान केली. द्रविड यांनी गावस्करांना या विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. बीसीसीआयतर्फे या अविस्मरणीय क्षणाची व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेयर करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “श्रेयस अय्यरसाठी अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला दिग्गज सुनिल गावस्कर यांनी कॅप सोपवली आहे”. या व्हिडीओदरम्यान संघाचे प्रशिक्षक द्रविड देखील दिसत आहेत. कॅप प्रदान केल्यानंतर गावस्कर यांनी अय्यरशी चर्चा केली.

लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान रांचीमध्ये प्रशिक्षक द्रविड यांनी हर्षल पटेलला राष्ट्रीय संघाची कॅप प्रदान करण्यासाठी अजित अगरकर यांना आमंत्रित केले होते. तर पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरला खुद्द द्रविड यांनी कॅप सोपवली होती.

यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या युवा भारतीय संघासोबत द्रविड प्रशिक्षक म्हणून गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान देखील राहुल द्रविड यांच्याद्वारे कॅप प्रदान करण्याची परंपरा चालू ठेवली होती, तेव्हा भारतीय संघाचे बडे खेळाडू शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी युवा खेळांडूना कॅप प्रदान केली होती. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळांडूकडून राष्ट्रीय कॅप प्रदान करण्याची परंपरा राहिली आहे. मात्र भारतात पहिल्यांदाच अशी परंपरा होती मात्र मागील काही काळ फक्त कर्णधार किंवा वरिष्ठ खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्यच पदार्पण करणाऱ्या खेळाडूला कॅप प्रदान करत होता.


हे ही वाचा: mahmudullah resign : बांगलादेशच्या महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेट मधून घेतला संन्यास; BCB सोबतच्या वादावरून चर्चा