घरक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया 'अ' दुसरा सराव सामना शुक्रवारपासून 

भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ दुसरा सराव सामना शुक्रवारपासून 

Subscribe

कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून अ‍ॅडलेड येथे होणारी पहिली कसोटी प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या सरावाच्या दृष्टीने शुक्रवारपासून होणारा तीन दिवसीय सराव सामनाही प्रकाशझोतात होईल. भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल.

तीन दिवसीय सराव सामन्यात लोकेश राहुलच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. या सामन्यात चांगली कामगिरी केल्यास राहुल पहिल्या कसोटीत मयांक अगरवालच्या साथीने सलामीला खेळू शकेल. सराव सामन्यात अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव हे भारताचे प्रमुख गोलंदाज खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. तसेच भारताने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतल्यास चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिल्या सराव सामन्यात कुलदीपला एकही विकेट घेता आली नव्हती.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिला सराव सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात भारताचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. तसेच पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (५४) आणि दुसऱ्या डावात वृद्धिमान साहा (नाबाद ५४) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. आता दुसऱ्या सराव सामन्यात भारताचे सर्व फलंदाज चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -