घरक्रीडाभारताने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळूच नये!

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळूच नये!

Subscribe

नरेंदर बत्रा यांचे विधान

राष्ट्रकुल स्पर्धेला फारसे महत्त्व नाही आणि भारताला या स्पर्धेत खेळण्याची गरज नाही, असे विधान भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी केले. नेमबाजी या खेळाला वगळल्यामुळे २०२२ साली बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा आयओए विचार करत आहे. भारतीय नेमबाजांनी मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्यास भारताचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने या स्पर्धेपेक्षा दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा विचार केला पाहिजे, असे बत्रा यांना वाटते.

राष्ट्रकुल स्पर्धेचा स्तर चांगला नाही. त्यामुळे या स्पर्धेला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६०-७० ते अगदी १०० पदके मिळतात. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याला १-२ पदकांवर समाधान मानावे लागते. आपण ऑलिम्पिकच्या तयारीसाठी राष्ट्रकुलपेक्षा चांगल्या स्पर्धेचा विचार केला पाहिजे. राष्ट्रकुल स्पर्धेत काहीच खेळ असे आहेत, ज्यात खेळल्याचा खेळाडूंना फायदा होतो. मात्र, खेळाडूंच्या कामगिरीत आणि खेळात सुधारणा होण्यासाठी आपण या स्पर्धेपेक्षाही दर्जेदार स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे. आपण सर्वांना खुश करू शकत नाही. ३० देश असे आहेत, जे राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत नाहीत. त्यामुळे आपण या स्पर्धेत खेळलेच पाहिजे असे नाही. परंतु, अंतिम निर्णय सरकारचा असेल, असे बत्रा म्हणाले.

- Advertisement -

बत्रांचे विधान अयोग्य!

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याची गरज नाही, असे विधान आयओएचे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी केले. त्यांचे हे विधान अयोग्य आहे, असे मत भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू साथियनने व्यक्त केले. साथियनने २०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले होते. साथियनच्या मताशी भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग सहमत होता. त्यांचे विधान चुकीचे आहे. त्यांच्या बोलण्यानुसार विचार करायचा झाला, तर भारताने ऑलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांव्यतिरिक्त इतर स्पर्धांना आपले संघ पाठवता कामा नये. कारण या स्पर्धांचा स्तर चांगला नसतो. या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी यश मिळवले आहे, त्याला महत्त्व नाही का? बॉक्सिंगबाबत बोलायचे तर राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंड आणि आयर्लंड या देशांचे आघाडीचे बॉक्सर खेळतात, असे विजेंदर म्हणाला. तसेच बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप, थाळीफेकपटू कृष्णा पुनिया, तिरंदाज राहुल बॅनर्जी यांसारख्या खेळाडूंनीही भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळले पाहिजे असे मत व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -