घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची भारताला संधी; तिसरी टी-२० आज

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची भारताला संधी; तिसरी टी-२० आज

Subscribe

भारताने पहिले दोन्ही सामने जिंकत टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

विराट कोहलीच्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका खिशात घातली. त्यामुळे आता मंगळवारी होणारा तिसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निराशाजनक सुरुवात करताना दोन एकदिवसीय सामने गमावले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अखेरचा एकदिवसीय सामना जिंकला. हा आत्मविश्वास टी-२० मालिकेत त्यांना कामी आला. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकत टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारताने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावली होती आणि त्यानंतरची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची कोहलीच्या संघाला संधी आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सहा विकेट राखून विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे भारताचे प्रमुख खेळाडू खेळले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत नवख्या टी. नटराजनने भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली. सर्व गोलंदाजांची धुलाई होत असताना नटराजनने मात्र चार षटकांत अवघ्या २० धावा देत मोईसेस हेन्रिक्स आणि डार्सी शॉर्ट यांचा अडसर दूर केला.

- Advertisement -

फलंदाजीत हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा चमक दाखवली. त्याने २२ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. हार्दिकने या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून सर्वाधिक २१० धावा केल्या होत्या. तोच दमदार फॉर्म त्याने टी-२० मालिकेतही कायम राखला आहे. आता तो तिसऱ्या टी-२० सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.


सामन्याची वेळ : दुपारी १.४० पासून
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -