घरक्रीडातिरंदाजी विश्वचषक : भारतीय महिला संघ एका पॉईंटने पराभूत

तिरंदाजी विश्वचषक : भारतीय महिला संघ एका पॉईंटने पराभूत

Subscribe

विश्वचषकात फ्रान्सच्या संघांने भारताच्या महिला संघाचा पराभव करत स्पर्धेत बाजी पटकावली असून भारताला मात्र स्पर्धेत रौप्यपदकच मिळाले आहे

जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या ‘बर्लिन २०१८ तिरंदाजी विश्वचषक’ या स्पर्धेत भारताच्या महिला संघाचा अंतिम सामन्यात फ्रान्सकडून अवघ्या एका पॉईंटने पराभव झाल्यामुळे स्पर्धेत भारताने दुसरे तर फ्रान्सने पहिले स्थान मिळवले आहे.


स्पर्धेतील अंतिम फेरीत भारतीय महिला संघाचा फ्रान्सच्या संघाने २२९-२२८ च्या फरकाने पराभव केला आहे. अवघ्या एका गुणाच्या फरकामुळे भारतीय तिरंदाजांना हार पत्करावी लागली असून यावेळी भारतीय महिलांना रौप्यपदकावरच  समाधान मानावे लागले आहे. भारताकडून या विशवचषकात त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार यांच्या महिला भारतीय तिरंदाजी संघाने जर्मनीच्या बर्लिन शहरात सुरु असलेल्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

- Advertisement -

अंतिम सामन्यांच्या पहिल्या फेरीत भारताने ५९-५७ च्या फरकाने आघाडी घेतली खरी मात्र दुसऱ्या फेरीत फ्रान्सने ११६-११६ च्या फरकाने सामन्यात बरोबरी साधली आणि अखेरच्या फेरीत ५९-६० ने विजय मिळवत फ्रान्सने सामना आपल्या नावे केला.

भारतीय महिला संघांने स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच चांगली कामगिरी केली होती. स्पर्धेत सर्वात आधी भारतीय महिला संघाच्या या त्रिकूटाने ग्रेट ब्रिटनला २२४-२२३ च्या फरकाने पराभूत करत पहिली फेरी जिंकली तर दुसऱ्या फेरीत अमेरिकेला २३२-२२८ च्या फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत झेप घेतली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत तुर्कीच्या संघावर २३१-२२८ च्या फरकाने विजय मिळवत भारताने अंतिम फेरी गाठली होती. अखेर अंतिम फेरीत फ्रान्सकडून एका पॉईंटने पराभूत झाल्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -