घरक्रीडाडोपिंगच्या शिक्षेला कुस्तीपटू सुमित मलिक देणार आव्हान; शिक्षेचा कालावधी कमी करण्याची मागणी

डोपिंगच्या शिक्षेला कुस्तीपटू सुमित मलिक देणार आव्हान; शिक्षेचा कालावधी कमी करण्याची मागणी

Subscribe

आपला खोटेपणा करण्याचा हेतू नव्हता असे सांगत सुमित आपली शिक्षा दोन वर्षांऐवजी सहा महिने करावी, अशी मागणी करणार आहे.

उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळल्यामुळे संयुक्त जागतिक कुस्ती (UWW) संघटनेने भारताचा कुस्तीपटू सुमित मलिकवर दोन वर्षांची बंदी घातली होती. ही शिक्षा मान्य करायची की या शिक्षेला आव्हान द्यायचे, हे ठरवण्यासाठी २८ वर्षीय सुमितला एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. सुमितने या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षेचा कालावधी कमी करण्याची तो मागणी करणार आहे. पुढील वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा होणार असून गतविजेत्या सुमितचा आपले जेतेपद राखण्याचा प्रयत्न आहे.

पात्रता स्पर्धेत डोपिंगमध्ये दोषी आढळला

डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने सुमितवर मागील शुक्रवारी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बल्गेरिया येथे झालेल्या पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सुमित १२५ किलो वजनी गटामध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतु, या पात्रता स्पर्धेतच डोपिंगमध्ये तो दोषी आढळला होता. त्यामुळे मागील महिन्यात त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनला त्याच्या ‘बी’ सॅम्पलची चाचणी झाली आणि त्याचाही निकाल सॅम्पल ‘ए’प्रमाणेच आला. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि या बंदीचा कालावधी ३ जूनपासून सुरु झाला होता. परंतु, सुमित या निर्णयाला आव्हान देणार आहे.

औषधे, सप्लिमेंट्स चाचणीसाठी अमेरिकेत

सुमितने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला आपले जेतेपद राखायचे आहे. सुमितने त्याच्या शरीरात सापडलेल्या या प्रतिबंधित घटकाची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु, आपला खोटेपणा करण्याचा हेतू नव्हता असे सांगत सुमित आपली शिक्षा दोन वर्षांऐवजी सहा महिने करावी, अशी मागणी युडब्ल्यूडब्ल्यूकडे करणार आहे. सुमितने तो घेत असलेली औषधे आणि सप्लिमेंट्स अमेरिकेत चाचणीसाठी पाठवली आहेत. सुमितच्या शरीरात सापडलेला घटक या औषधांमध्ये  आणि सप्लिमेंट्समध्ये असल्यास त्याने तो घटक जाणूनबुजून घेतला नसल्याचे सिद्ध होईल.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -