Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : BCCI ची चिंता वाढली! वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांना...

IPL 2021 : BCCI ची चिंता वाढली! वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांना कोरोना

स्टेडियममध्ये प्लम्बिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्लम्बिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. मागील शनिवारी याच स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आता बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची चिंता वाढली आहे. वानखेडेवर यंदाच्या आयपीएलचे दहा सामने होणार आहेत.

मुंबईमधील सामन्यांवर प्रश्नचिन्ह

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून इतर दिवशी नाईट कर्फ्यू असणार आहे. मात्र, असे असले तरी मुंबईत आयपीएलचे सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिवसंजय नाईक यांनी व्यक्त केला होता. परंतु, आता ग्राऊंड स्टाफपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची बाधा झाल्याने मुंबईमधील सामन्यांवर प्रश्नचिन्ह आहेत.

मुंबईमध्ये यंदा दहा सामने

- Advertisement -

‘वानखेडे स्टेडियमवरील तीन जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ग्राऊंड स्टाफपैकी दोघांचा समावेश आहे,’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रात सोमवारी (काल) ४७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, त्यापैकी ८ हजारांहून अधिक रुग्ण हे मुंबईत सापडले होते. मुंबईमध्ये यंदा एकूण दहा आयपीएल सामने होणार आहेत. यापैकी पहिला सामना १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये होईल.

- Advertisement -