World Tour Finals : सिंधू, किदाम्बी श्रीकांत सलामीच्या सामन्यात पराभूत 

सिंधू आणि यिंग या दोघींमध्ये आतापर्यंत २१ सामने झाले असून १६ सामन्यांत सिंधू पराभूत झाली आहे. 

pv sindhu and srikanth
पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. गट ‘बी’मधील महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूवर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या ताय झू यिंगने २१-१९, १२-२१, १७-२१ अशी मात केली. या सामन्यात सिंधूने यिंगला चांगली झुंज दिली. तिने पहिला गेम २१-१९ असा जिंकला. मात्र, यानंतर यिंगने दमदार पुनरागमन करत पुढील दोन्ही गेम जिंकले. सिंधू आणि यिंग या दोघींमध्ये आतापर्यंत २१ सामने झाले असून १६ सामन्यांत सिंधू पराभूत झाली आहे.

अँटोनसनची श्रीकांतवर मात

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतलाही विजयी सुरुवात करण्यात अपयश आले. पहिल्या साखळी सामन्यात डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसनने श्रीकांतवर १५-२१, २१-१६, २१-१८ अशी मात केली. श्रीकांतने आक्रमक खेळ करत पहिला गेम २१-१५ असा मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर त्याला चांगला खेळ करता आला नाही. अँटोनसनने मात्र आपला सर्वोत्तम खेळ करत हा सामना जिंकला. आता दुसऱ्या साखळी सामन्यात सिंधूपुढे रॅटचनॉक इंटानोनचे, तर श्रीकांतपुढे वांग झू वेचे आव्हान असेल.


हेही वाचा – ऑनलाईन रम्मीचे प्रोमोशन केल्याने ‘या’ स्टार क्रिकेटपटूला नोटीस