घरक्रीडामियांदादप्रमाणे कोहलीकडून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळते!

मियांदादप्रमाणे कोहलीकडून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळते!

Subscribe

आमिर सोहेलचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने आताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके लगावली आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली असून तो सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलने कोहलीची पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादशी तुलना केली. मियांदादप्रमाणे कोहलीकडूनही त्याच्या संघातील इतर खेळाडू प्रेरणा घेतात, असे मत सोहेलने व्यक्त केले.

काही महान खेळाडू वैयक्तिक पातळीवर चांगला खेळ करतात, पण त्याचा संघाला फायदा होत नाही. तुम्ही जेव्हा पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आणि महानतेचा विचार करता, तेव्हा तुमच्या डोक्यात सर्वात आधी जावेद मियांदादचे नाव येते. त्याच्या महानतेबाबत अजूनही चर्चा होते, कारण त्याच्या खेळामुळे संघातील इतर खेळाडूंचे मनोधैर्य वाढायचे. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतर खेळाडू आपला खेळ उंचवायचे. त्याच्यासोबत तुमची मोठी भागीदारी झाली, तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळायचे. त्यामुळे तुमच्या खेळात सुधारणा व्हायची. कोहलीबाबत हेच म्हणता येईल. तुम्ही कोहलीच्या आजूबाजूच्या खेळाडूंकडे पाहिलेत, तर त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतर खेळाडूंमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळेच कोहली हा महान खेळाडू मानला जातो, असे सोहेल यांनी सांगितले.

- Advertisement -

मियांदाद हा पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने १२४ कसोटी आणि २३३ एकदिवसीय सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले, ज्यात त्याने अनुक्रमे ८८३२ आणि ७३८१ धावा केल्या होत्या. दुसरीकडे कोहली आताच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असून त्याने ८६ कसोटीत ७२४० धावा, २४८ एकदिवसीय सामन्यांत ११८६७ आणि ८२ टी-२० सामन्यांत २७९४ धावा केल्या आहेत.

तो डॉन ब्रॅडमननंतरचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनू शकतो – संगकारा
विराट कोहली खूप फिट आहे. तो एक वेगळाच खेळाडू असून इतर खेळाडूंना त्याच्याकडून प्रेरणा मिळते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून कोहली हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मला कोहलीची सर्वात आवडणारी बाब म्हणजे तो खूप जिद्दी आणि आक्रमक वृत्तीचा आहे. तो आपल्या भावना लपवून ठेवत नाही. तसेच तो जुन्या काळातील खेळाडूंप्रमाणे खेळतो. तो वेडेवाकडे फटके न मारताही सातत्याने धावा करतो. मी कोहलीचा प्रशंसक आहे आणि तो आताच महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याची त्याच्याकडे संधी आहे, असे श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकारा भारतीय कर्णधाराविषयी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -