घरक्रीडामहाराष्ट्राने रचला आंतरराष्ट्रीय कबड्डीचा पाया

महाराष्ट्राने रचला आंतरराष्ट्रीय कबड्डीचा पाया

Subscribe

कबड्डी हा भारतातील एक प्राचीन खेळ. या खेळाचा नेमका उगम कसा व केव्हा झाला याविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही. परंतु, आपल्या देशातील प्रत्येक राज्यात थोड्याफार फरकाने हा खेळ खेळला जात असे. महाराष्ट्रात व इतर राज्यातही पैलवान आपल्या-आपल्या अंगी असलेली रग जिरवण्यासाठी हा खेळ खेळत असत. काही जण एकत्र जमत. मैदानाची लांबी-रुंदी ठरलेली नसे. फक्त एक मध्यरेषा तेवढी असे. काही न उच्चारता प्रतिस्पर्ध्यांच्या हद्दीत जाऊन निसटून यायचे. गडी पकडला गेल्यावर त्याच्या छातीवर तो चीत म्हणेपर्यंत इतर खेळाडू बसत. महाराष्ट्रात होळी, शिमगा अशा सणांच्या वेळी हा खेळ खेळला जाई. प्रामुख्याने आखाड्यात व तालमीत हा खेळ खेळला जाई. मुका असलेला हा खेळ हळुहळू बोलका होऊ लागला. सू सू, सूर सूर, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानकी, हुतूतू अशा वेगवेगळ्या शब्दोच्चारांनी हा खेळ बोलका झाला.

जसजसा काळ लोटत गेला तसतसा हा खेळ लोकप्रिय होत गेला. महाराष्ट्रात या खेळाला नंतर हुतूतू म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण देशात या खेळाला काही प्रमाणात समान स्वरूप प्राप्त झाले होते. असे असले तरी देशातील विविध राज्यांत या खेळाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जात असे. महाराष्ट्रात हुतूतू, केरळात ‘वंडीवडी‘, मद्रासमध्ये ‘चेडूयुडू‘, पंजाबात ‘झाबर गंगा’, ‘सौची पक्की’ , बंगालमध्ये ‘हुडूडू’, उत्तर भारतात ‘कोनवरा’, ‘साबरगण्णा’ अशा नावांनी हा खेळ ओळखला जात असे. या सार्‍या प्रादेशिक सुरांचे एकात्मिकरण करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. प्रादेशिकता बाजूला जाऊन संपूर्ण भारतात हा खेळ ‘कबड्डी‘ म्हणून ओळखला जाऊ लागला तो महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या प्रयत्नांमुळे. या खेळातील विविधतेतून महाराष्ट्राने एकता निर्माण केली.

पूर्वी हुतूतू हा खेळ काही ठरावीक नियमांनीच खेळला जात असे. नियमांच्या अभावीपूर्वी गोंधळ माजत असे. म्हणूनच हुतूतू हा शब्द गोंधळ, धांगडधिंगा या अर्थी वापरला जात असे. १९३१ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन अकोला येथे झाले. त्या अधिवेशनात भारतीय देशी खेळांचे नियम तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने भारतीय देशी खेळांचे नियम तयार केले. या नियमांना नाशिक येथे १९३७ साली झालेल्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली. त्यात हुतूतू (कबड्डी) खेळाचा समावेश होता. १९३८ साली नियमात काही दुरुस्त्या करण्यात आल्या. याच सालात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळाचा समावेश करण्यास मान्यता दिली. महाराष्ट्रात तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जाऊ लागला. १९४४ साली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्रात तयार करण्यात आलेल्या हुतूतूच्या नियमांना मान्यता दिली. विविध नावाने व दमाने खेळल्या जाणार्‍या या खेळाच्या एकात्मतेसाठी १९४५ सालापासून प्रयत्न होऊ लागले. खुद्द महाराष्ट्रातही त्यामुळे वादळ उठले.

- Advertisement -

हुतूतू-कबड्डी हा वाद शिगेला पोहोचला होता. १९५२ साली सदुभाऊ गोडबोले समितीने ‘कबड्डी‘ शब्दोच्चाराचा नियम व शिफारस केली. १९५३ साली ‘कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ने दम घेण्यासाठी ‘कबड्डी‘ या शब्दोच्चाराचाच वापर करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा खेळ कबड्डी म्हणून ओळखला जाऊ लागला.महाराष्ट्राने कबड्डीला एका सुरात बांधले. नियमबद्ध केले. असे असले तरी कबड्डीचा प्रसार मात्र संपूर्ण देशात ज्या वेगाने व्हायला पाहिजे होता, त्या वेगाने होत नव्हता. कारण कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया या कबड्डीच्या राष्ट्रीय संघटनेचे काम पाहत होते बद्रीप्रसाद त्रिपाठी. तेच या संघटनेचे सर्वेसर्वा होते. ते या संघटनेचा उपयोग केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी करून घेत असत. त्रिपाठींविरुध्द महाराष्ट्रानेच बंड केले. त्रिपाठींना हाकलण्यात महाराष्ट्राला यश मिळाले. त्यांच्या जागी मोहन धारिया हे राष्ट्रीय संघटनेचे पहिले मराठी अध्यक्ष बनले. त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीतच या संघटनेचे नाव बदलून भारतीय हौशी कबड्डी महासंघ असे करण्यात आले. १९७२ साली नव्या महासंघाने आपली पहिली राष्ट्रीय स्पर्धा जयपूर येथे घेतली.

कबड्डीविषयी आत्मियता असलेल्या कबड्डीवर प्रेम करणार्‍या मराठी माणसाच्या हाती देशाच्या कबड्डीची सूत्रे येताच कबड्डीचा प्रसार वेगाने झाला. १९७३ साली महासंघाने कबड्डीच्या नियमांत काही बदल घडवून हा खेळ गतीमान करण्याचा प्रयत्न केला. कबड्डीला नियमात बांधतानाच या खेळाचा प्रसार होणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यासाठी संघटनेला पैसा हवा होता. महासंघाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याची जबाबदारी वास्तविक संपूर्ण देशाची होती. परंतु, ते कामही महाराष्ट्रानेच केले. महासंघासाठी पैसे देण्यासाठी मराठी माणूसच पुढे आला.

- Advertisement -

आणीबाणीच्या काळात पडलेल्या मर्यादांमुळे मोहन धारिया यांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघ अध्यक्षपद सोडले. या महासंघाचे अध्यक्षपद शरद पवारांकडे आले. सरचिटणीस शंकर उर्फ बुवा साळवी आणि शरद पवार यांनी कबड्डीच्या प्रसारासाठी अपार मेहनत घेतली. कबड्डीला देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचविले. कबड्डीने देशाच्या सीमा ओलांडल्या. शरद पवार व बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. १९८२ साली एशियन कबड्डी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष होते शरद पवार. १९८२ हे कबड्डीचे भाग्याचे वर्ष. नवी दिल्ली येथे झालेल्या नवव्या एशियाड स्पर्धेत प्रदर्शनीय खेळ म्हणून कबड्डीचा समावेश करण्यात आला. १९९० साली बीजिंग येथे झालेल्या एशियाडपासून कबड्डीचा एशियामध्ये समावेश करण्यात आला.

शरद पवार व बुवा साळवी यांच्या प्रयत्नांमुळे कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीने आशिया खंडाची वेसही ओलांडली. देशात कबड्डीचा विकास झाला व प्रचार झाला. कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. याचे श्रेय महाराष्ट्रालाच जाते.

प्रकाश सोनवडेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -