घरक्रीडागोलंदाजांकडून ‘पुन्हा’ निराशा!

गोलंदाजांकडून ‘पुन्हा’ निराशा!

Subscribe

मुंबई-मध्य प्रदेश रणजी सामना अनिर्णित

गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केल्यामुळे मुंबईला यंदाच्या रणजी मोसमातील आपला अखेरचा सामना जिंकण्यात अपयश आले. वानखेडेत झालेला मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईने चौथ्या डावात मध्य प्रदेशसमोर ४०८ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसअखेर मध्य प्रदेशची २ बाद ४४ अशी अवस्था होती. त्यामुळे चौथ्या दिवशी मुंबईचे गोलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देतील अशी आशा होती. मात्र, त्यांना शेवटच्या दिवशी केवळ चार विकेट मिळवता आल्या. त्यामुळे या सामन्याआधीच स्पर्धेबाहेर झालेल्या मुंबईला आपला अखेरचा सामनाही जिंकता आला नाही.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजीत ४२७ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना मध्य प्रदेशचा डाव २५८ धावांत आटोपला. मुंबईने आपला दुसरा डाव ५ बाद २३८ धावांवर घोषित करत मध्य प्रदेशपुढे सामना जिंकण्यासाठी ४०८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना त्यांची ३ बाद ४५ अशी अवस्था होती. मात्र, आदित्य श्रीवास्तव आणि पहिल्या डावात ९३ धावांची खेळी करणार्‍या वेंकटेश अय्यरने १२६ धावांची भागीदारी रचत मध्य प्रदेशचा डाव सावरला. अखेर डावखुरा वेगवान गोलंदाज रॉयस्टन डायसने अय्यरला ५९ धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली.

- Advertisement -

यानंतर दीपक शेट्टीने कर्णधार शुभम शर्मा (५) आणि यश दुबे (०) यांना झटपट माघारी पाठवल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. मात्र, श्रीवास्तव आणि मिहीर हिरवानी ही मध्य प्रदेशची सातवी जोडी फोडण्यासाठी मुंबईच्या गोलंदाजांना जवळपास ३५ षटकेही कमी पडली. या दोघांनी १३१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे सामन्याअंती मध्य प्रदेशची दुसर्‍या डावात ६बाद ३१४ अशी धावसंख्या होती. मुंबईला यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले. हा त्यांचा यंदाच्या मोसमातील अनिर्णित राहिलेला पाचवा सामना होता, तर त्यांना केवळ १ सामना जिंकता आला.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : ४२७ आणि ५ बाद २३८ डाव घोषित वि. मध्य प्रदेश : २५८ आणि ६बाद ३१४ (आदित्य श्रीवास्तव नाबाद १३०, मिहीर हिरवानी नाबाद ६९, वेंकटेश अय्यर ५९; दीपक शेट्टी २/४६).

- Advertisement -

उपांत्यपूर्व फेरीतील लढती :
गुजरात वि. गोवा
बंगाल वि. ओडिशा
कर्नाटक वि. जम्मू-काश्मीर
सौराष्ट्र वि. आंध्र प्रदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -