नुबैरशाहने जिंकली सिल्व्हरलेक खुली बुद्धिबळ स्पर्धा

या स्पर्धेत अपराजित वाटचाल करत नुबैरशाहने नऊ फेऱ्यामध्ये सात गुणांची कमाई करत सन्मानचिन्ह, सुवर्णपदकासह सुमारे एक लाख दहा हजार सर्बियन डॉलर्स (भारतीय चलनात ७७, ६०५ रुपये) रकमेचे बक्षीस आपल्या खिशात टाकले.

ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू नुबैरशाह शेखने (International Master chest player Nubershah Shaikh) आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोचताना सर्बियात झालेल्या सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत अपराजित वाटचाल करत नुबैरशाहने नऊ फेऱ्यामध्ये सात गुणांची कमाई करत सन्मानचिन्ह, सुवर्णपदकासह सुमारे एक लाख दहा हजार सर्बियन डॉलर्स (भारतीय चलनात ७७, ६०५ रुपये) रकमेचे बक्षीस आपल्या खिशात टाकले. (Nubershah wins Silver Lake Open Chess Tournament)

हेही वाचा – खेळाडू नसतानाही क्रिडा क्षेत्रात कसं घडवाल करियर?

म्युन्सिपालटी वेलीको ग्रॅडिस्ट, चेस फेडरेशन ऑफ सेंट्रल सर्बिया आणि दानुबिया हॉटेल आयोजित स्पर्धेच्या शेवटच्या, नवव्या फेरीत नुबैरशाहने हंगेरीच्या क्रस्तुलोव्हीच ऍलेक्सचा पराभव करत आपले विजेतेपद निश्चित केले . चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात नुबैरशाहने ७० चालींच्या खेळानंतर हा विजय नोंदवला. सामन्यात नुबैरशाहची अडखळत सुरुवात झाली. पण डावाच्या मध्यात नुबैरशाहने क्रस्तूलोव्हीचला वारंवार चुका करायला भाग पाडून सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याऱ्या नुबैरशाहने तैपैईचा इंटरनॅशनल मास्टर सॉंग रेमंड, लुथनियाचा ग्रँडमास्टर स्ट्रेमविसीमुस टिटास, सर्बियाचे ग्रँडमास्टर दलिजानोव्हीच ब्रांको आणि स्त्रिकोव्हीच अलेक्स यांना बरोबरीत रोखले होते. स्थापत्यशास्त्रातील पदवीधर असलेल्या नुबैरशाहने या स्पर्धेतून +१५ गुणांची कमाई करत ग्रँडमास्टर किताबाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.