घरक्रीडाIND vs AUS : फलंदाजांना खेळ सुधारण्याची गरज - अजिंक्य रहाणे

IND vs AUS : फलंदाजांना खेळ सुधारण्याची गरज – अजिंक्य रहाणे

Subscribe

या मालिकेत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना १४६ धावांनी गमावला. तर या मालिकेत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तर याआधी झालेल्या द.आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यांमध्येही कोहली वगळता इतर भारतीय फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले होते. त्यामुळे जर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पुढील दोन सामने जिंकत ही मलिका जिंकायची असेल तर भारताच्या फलंदाजांना आपला खेळ सुधारत गोलंदाजांना चांगली साथ देण्याची गरज आहे असे विधान भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केले आहे.

सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्याची आवश्यकता

रहाणे म्हणाला की, ही मालिका जर आम्हाला जिंकायची असेल तर आमच्या फलंदाजांनी आपला खेळ सुधारण्याची गरज आहे. आम्ही सतत याबाबत चर्चा करतो. जर कसोटी सामने जिंकायचे असतील तर गोलंदाजांनी २० विकेट घेणे आवश्यक असते आणि आमचे गोलंदाज मागील काही काळापासून ते करत आहेत. पण त्याचसोबत फलंदाजांनीही सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्याची आवश्यकता असते आणि तसे करण्यात आम्हाला अपयश येत आहे. त्यामुळे आमच्या फलंदाजांनी खेळ सुधारत गोलंदाजांना चांगली साथ देण्याची गरज आहे.

पुढील सामन्यात शतक करण्याचा विश्वास 

तसेच रहाणेला ऑगस्ट २०१७ पासून कसोटी सामन्यात शतक करण्यात अपयश आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारून बाद झाला. पण मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत शतक होईल असा त्याला विश्वास आहे. याबाबत तो म्हणाला, मी अॅडलेडपासून (पहिला कसोटी सामना) ज्याप्रकारे फलंदाजी करतो आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की मेलबर्न येथे माझे शतक होईल. मला वाटते की मी या सामन्याच्या दोन्ही डावांत शतक करेन, पण मला याबाबत जास्त विचार करायचा नाही आहे. माझ्यासाठी वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचे यश जास्त महत्वाचे आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -