Ranji Trophy : सौराष्ट्रविरुद्ध मुंबईला आघाडी

मुंबईला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली.

श्रेयस अय्यर
गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी चषकातील सामन्यात मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळाली. मुंबईने पहिल्या डावात केलेल्या ३९४ धावांचे उत्तर देताना सौराष्ट्रला पहिल्या डावात ३४८ धावाच करता आल्याने मुंबईला ४६ धावांची आघाडी मिळाली. तर तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची दुसऱ्या डावात ५ बाद १७५ अशी धावसंख्या आहे. त्यामुळे मुंबईकडे २२१ धावांची आघाडी आहे.

चिराग जानीचा चांगला खेळ   

तिसऱ्या दिवशी ५ बाद २१३ वरून पुढे खेळताना सौराष्ट्रचा प्रेरक मंकड ५९ धावांवर बाद झाला. तर जाडेजा (१२) आणि कर्णधार जयदेव उनाडकट (१६) झटपट माघारी परतले. मात्र चिराग जानीने एका बाजूने अप्रतिम फलंदाजी करत १७६ चेंडूंत ८५ धावा केल्या. त्याला साकारियाने ६७ चेंडू खेळत चांगली साथ दिली. त्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला ४६ धावांची आघाडी मिळाली. मुंबईकडून डायस, शिवम दुबे, कोटियान आणि मिनाद मांजरेकरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

अय्यरची आक्रमक खेळी

मुंबईच्या दुसऱ्या डावाची खराब सुरुवात झाली. मुंबईने ४४ धावांतच ३ विकेट गमावल्या. पण यानंतर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. दुबे ३९ धावा करून बाद झाला. तर अय्यरने आक्रमक फलंदाजी करत ६१ चेंडूंत ८३ धावा केल्या. पण दिवस संपण्याच्या काहीवेळ आधी तो बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर मुंबईची दुसऱ्या डावात ५ बाद १७५ अशी धावसंख्या आहे. मुंबईकडे २२१ धावांची आघाडी आहे.