पाक क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का; युनिस खानने फलंदाजी प्रशिक्षकपद सोडले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा निर्णय अनपेक्षित होता. 

younis khan
युनिस खानने फलंदाजी प्रशिक्षकपद सोडले

युनिस खानने पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युनिसच्या या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय अनपेक्षित होता. युनिसने आपले पद सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी संघनिवड करताना विचारणा होत नसल्याबद्दल तो नाराज होता. तसेच पाकिस्तानचा संघ भविष्याच्या दृष्टीने फारसा विचार करत नसल्याने युनिस समाधानी नव्हता. त्यामुळेच त्याने पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडण्याचे म्हटले जात आहे.

फलंदाजी प्रशिक्षकाविनाच इंग्लंड दौरा

युनिसची मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांसाठी नेमणूक झाली होती. तो २०२२ टी-२० वर्ल्डकपपर्यंत पाक संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवणार होता. परंतु, त्याने आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ फलंदाजी प्रशिक्षकाविना इंग्लंडमध्ये जाणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची लवकरच निवड केली जाईल,’ असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

पाकिस्तान संघाच्या इंग्लंड दौऱ्याला २५ जूनपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० मालिकांची मालिका होणार असून या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ फलंदाजी प्रशिक्षकाविनाच खेळणार आहे. ‘युनिस खानसारख्या उत्कृष्ट आणि अनुभवी प्रशिक्षकाने आपल्या पायउतार होणे आमच्यासाठी खेदजनक आहे. परंतु, तो पुढेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मदत करत राहील अशी आशा आहे,’ असे पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान म्हणाले.