घरक्रीडा'दंगल' भगिनींच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा, राष्ट्रीय शिबिरातून हकालपट्टी!

‘दंगल’ भगिनींच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा, राष्ट्रीय शिबिरातून हकालपट्टी!

Subscribe
‘दंगल’ या हिंदी चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या फोगट भगिनींना कुस्तीच्या राष्ट्रीय शिबिरातून हाकलण्यात आले आहे. गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना त्यांच्या बेशिस्तपणा आणि नखऱ्यांमुळे शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाकडून सांगितले जात आहे. चित्रपटानंतर मिळालेल्या प्रसिद्धीची हवा त्यांच्या डोक्यात गेली असल्याने त्यांचा भाव वधारल्याचे चित्र आहे.
सध्या सुरु असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली आहे. पूर्वी बेशिस्तपणाच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींना शिबिरातून हाकलून दिले आहे. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
आशियाई खेळांसाठी सध्या लखनौ येथे शिबीर सुरु आहे. या शिबिरातील खेळाडूंना एशियाड खेळांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र फोगट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे फोगट भगिनींना आता आशियाई खेळांमध्येदेखील भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. हे आशियाई खेळ यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान जकार्ता आणि पालेमबंग येथे होणार आहेत. दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबिताने सांगितले आहे. मात्र गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

एकूण पंधरा पैलवानांवर कारवाई

फोगट भगिनीं बरोबरच आनखी पंधरा पहेलवांवर फेडरेशनच्या वतीने कारवाई केली आहे. या प्रसंगी १५ पुरुष व महिला पहेलवांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या यादीत ऑलिंपिक मेडल जिंकलेली साक्षी मलिकचा पती सत्यव्रत कादियानही सामील आहे.

कारवाई केलेल्या पैलवानांची यादी

ऋतु फोगाट (५० किलो), इंदु चौधरी (५० किलो), संगीता फोगाट (५७ किलो), गीता फोगाट (५९ किलो), रविता (५९ किलो), पूजा तोमर (६२ किलो), मनू (६२ किलो), नंदिनी सलोखे (६२ किलो), रेशमा माने (६२ किलो), अंजू (६५ किलो), मनू तोमर (७२ किलो), कामिनी (७२ किलो), बबीता फोगाट (५३ किलो), श्रवण (६१ किलो) आणि सत्यव्रत कादियान (९७ किलो).
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -