घरक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रेक्षकांविना खेळण्याचा खेळाडूंवर परिणाम होणार नाही!

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रेक्षकांविना खेळण्याचा खेळाडूंवर परिणाम होणार नाही!

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या घडीला जगातील दोन सर्वोत्तम कसोटी संघ मानले जातात. विराट कोहलीच्या भारतीय संघाने मागील वर्षीच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. आता हा संघ यावर्षाअखेरीस पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार असून या दोन बलाढ्य संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच दोन्ही संघांचे खेळाडूही या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका प्रेक्षकांविना होऊ शकेल. परंतु, दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडू असल्याने त्यांच्यावर प्रेक्षकांविना खेळण्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला वाटते.

कसोटी मालिकेचे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना झाले, तरी याचा खेळाडूंवर फारसा परिणाम होणार नाही. तुम्ही मैदानात उतरल्यावर बाकी सर्व गोष्टी विसरता. खेळपट्टीवर काय होत आहे केवळ यावर तुमचे लक्ष असते. एकदा का सामना सुरु झाला की बहुतांश खेळाडू आपण प्रेक्षकांसमोर खेळत आहोत हे विसरून जातात. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांसह होते किंवा प्रेक्षकांविना, याने फारसा फरक पडणार नाही. मैदानात जाऊन कोणत्या संघाचे खेळाडू कशी कामगिरी करतात यावर या मालिकेचा निकाल ठरेल, असे पेन म्हणाला.

- Advertisement -

मागील वर्षीची कसोटी मालिका आम्ही गमावली, कारण भारतावर दबाव टाकण्यासाठी पुरेशा धावा करण्यात आम्हाला अपयश आले. आमच्याकडे अप्रतिम गोलंदाज आहेत. परंतु, आम्ही पुरेशा धावा करु शकलो नाही, तर हे गोलंदाजसुद्धा आम्हाला सामने जिंकवू शकत नाहीत. आम्हाला मागील मालिकेत चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु, भारतालाही श्रेय दिले पाहिजे. त्यांनी आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला. त्या मालिकेतून आम्हाला खूप शिकायला मिळाले, असेही पेनने नमूद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ३ डिसेंबरपासून सुरुवात होईल.

इंग्लंड-विंडीज मालिकेवर नजर…

करोनामुळे मार्चपासून क्रिकेट बंद होते. परंतु, पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात होणार आहे. या मालिकेवर आमची नजर असेल, असे टीम पेनने सांगितले. मी कसोटी क्रिकेट पुन्हा पाहण्यास उत्सुक आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेवर आमची नजर असेल. करोनामुळे क्रिकेटच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा खेळावर काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे मी, प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि आमचे सर्व खेळाडू ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत, असे पेन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -