घरक्रीडाप्रणव फडकवणार आशियाई पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राचा झेंडा

प्रणव फडकवणार आशियाई पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राचा झेंडा

Subscribe

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रणव देसाई या धावपटूची निवड झाली आहे.

तिसऱ्या आशियाई पॅरा गेम्सना अवघे काहीच दिवस उरले आहेत. ही स्पर्धा ८ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत इंडोनेशियामध्ये होणार आहे. या स्पर्धेत ४० हून अधिक देशांचे ४००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रणव देसाई या धावपटूची निवड झाली आहे.

१०० मीटर आणि २०० मीटर या दोन धावण्याच्या शर्यतींत भाग घेणार

प्रणव प्रशांत देसाई हा अवघा १७ वर्षांचा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी निवड झालेला तो भारताचा सर्वात युवा खेळाडू आहे. तर या स्पर्धेसाठी निवड झालेला तो महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे. बारावीत शिकणारा प्रणव आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० मीटर आणि २०० मीटर या दोन धावण्याच्या शर्यतींत भाग घेणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटात असल्याने प्रणवला पदक मिळवण्यासाठी त्याच्याहून १०-१५ वर्षांनी मोठ्या धावपटूंना मागे टाकायचे आव्हान असेल. पण त्याने आपल्या युवा आयुष्यात यापेक्षाही अनेक मोठमोठ्या आव्हानांना मागे टाकले आहे.

- Advertisement -

धावण्याला प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी दिशा दिली

प्रणवला जन्मापासूनच एक पाय नाही. पण त्याच्या आईवडिलांनी या गोष्टीची त्याला जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी प्रणवला खूप प्रोत्साहन दिले. प्रणवला आधी स्केटिंगची खूप आवड होती. पण पुढे त्याला धावण्यातही रुची निर्माण झाली. त्याच्या या धावण्याला प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी दिशा दिली. प्रणव दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब,ठाणे येथे धावण्याचा सराव करू लागला. धावण्यासाठी त्याला कृत्रिम पाय लावावा लागला. कृत्रिम पायाची सवय नसल्याने सुरूवातीला प्रणवला काही अडचणी येत होत्या. पण प्रणवने हार मानली नाही. त्याने खूप मेहनत घेतली. त्यामुळे हळूहळू त्याच्या धावण्यात सुधारणा होत गेली. हे पाहून त्याला प्रशिक्षक पाटकर सरांनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिथूनच प्रणवचा खरा प्रवास सुरू झाला.

दुबई इंटरनॅशनल मीटच्या १०० मी. शर्यतीत रौप्यपदक

प्रणवने अगदी पहिल्या वर्षीपासूनच चांगले प्रदर्शन केले. प्रणवने पहिल्याच वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तर राष्ट्रीय स्तरावरही त्याने आपला ठसा उमटवला. त्याने ३ शर्यतींत पदके मिळवली. त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली. २०१७ मध्ये दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तो पहिल्यांदा भारताकडून खेळला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खुला गट असल्याने युवा प्रणवला सुरुवातीला पदके मिळाली नाही. मात्र दर स्पर्धेत त्याचा वेळ आणि प्रदर्शन सुधारत होते. त्याने यावर्षी झालेल्या दुबई इंटरनॅशनल मीटच्या १०० मी. शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे त्याची आशियाई पॅरा गेम्ससाठी निवड झाली. त्याने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रणवने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि जास्त अनुभवी असलेल्या स्पर्धकांना मागे टाकत पदकाची कमाई केली तर नवल नाही.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -