घरक्रीडाराहुलच करणार यष्टीरक्षक!

राहुलच करणार यष्टीरक्षक!

Subscribe

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल भारताच्या डावाची सुरुवात करणार असून लोकेश राहुल यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडेल, असे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला केले. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाल्यामुळे राहुलला यष्टिरक्षणची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. तसेच त्याने या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळताना ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी आणि मयांकला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे. राहुल पुन्हा मधल्या फळीतच फलंदाजी करेल. तसेच तो यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडेल. त्याला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून जास्तीतजास्त संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

रोहित शर्मा डाव्या पायाच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याविषयी कोहली म्हणाला, रोहित या मालिकेत खेळू शकणार नाही याचे दुःख आहे. एकदिवसीय, टी-२० आणि आता कसोटी क्रिकेटमध्येही तो आमचा प्रमुख खेळाडू आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळेल. तसेच तो खेळाडू दबावात कशी कामगिरी करतो, हे पाहण्याची आम्हाला संधी मिळेल.

विल्यमसन पहिल्या दोन सामन्यांना मुकणार!

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्याला टी-२० मालिकेच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ही दुखापत झाली. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज मार्क चॅम्पमनची न्यूझीलंड संघात निवड झाली आहे. तसेच पहिल्या दोन सामन्यांत टॉम लेथम न्यूझीलंडचे नेतृत्व करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -