IND vs ENG : रूट, स्टोक्सला भारतात धावा करणे अवघड जाईल – कुलदीप

भारताचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतील असे कुलदीपला वाटते.  

ben stokes, joe root, kuldeep
बेन स्टोक्स, जो रूट आणि कुलदीप यादव

इंग्लंडचा संघ आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला झुंज देईल. परंतु, जो रूट, बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांसारख्या इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना धावा करणे अवघड जाऊ शकेल, असे मत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होईल. इंग्लंडच्या संघाने काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दोन सामन्यांत ४२६ धावा फटकावल्या. यात एक द्विशतक आणि एका शतकाचा समावेश होता. मात्र, भारताचे गोलंदाज त्याला अडचणीत टाकू शकतील असे कुलदीपला वाटते.

बराच काळ क्रिकेट खेळलेले नाही

इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेत चांगला खेळ केला. त्यांनी श्रीलंकेच्या फिरकीपटूंवर ज्याप्रकारे प्रतिहल्ला केला, ते कौतुकास्पद होते. मी बराच काळ क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीत संधी मिळाल्यास मला सुरुवातीपासून योजनेनुसार गोलंदाजी करणे अवघड जाऊ शकेल. मात्र, इंग्लंडविरुद्ध मी याआधी बरेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कशी गोलंदाजी करायची हे मला ठाऊक आहे, असे कुलदीप एका मुलाखतीत म्हणाला.

रूट बॅकफूटवर चांगला खेळतो

रूट बॅकफूटवर जाऊन फिरकीपटूंना चांगला खेळतो. बटलरला आक्रमक शैलीत फलंदाजी करायला आवडते. स्टोक्सही बटलरप्रमाणे गोलंदाजांवर दबाव टाकतो. हीच त्या दोघांची ताकद आहे. मात्र, इंग्लंडचा संघ बऱ्याच काळानंतर भारतात कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना या कसोटी मालिकेत धावा करणे अवघड जाऊ शकेल. आमचे गोलंदाज त्यांना अडचणीत टाकू शकतील, असेही कुलदीपने नमूद केले.


हेही वाचा – कसोटी मालिका भारतच जिंकणार; इंग्लंडच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत