घरCORONA UPDATEसचिन म्हणतो, 'आता क्रिकेटमध्ये पहिल्यासारखं सेलिब्रेशन होणार नाही'!

सचिन म्हणतो, ‘आता क्रिकेटमध्ये पहिल्यासारखं सेलिब्रेशन होणार नाही’!

Subscribe

कोरोनामुळे सध्या जवळपास सगळं जग लॉकडाऊनमध्ये अडकलं आहे. व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा देखील स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात भारतातल्या आयपीएलचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये काय बदल घडतील, यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राऊटर्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, ‘क्रिकेटमध्ये आता पहिल्यासारखं सेलिब्रेशन होणार नाही’. एकच दिवस आधी सचिन तेंडुलकरचा एकेकाळचा टीममेट आणि टीम इंडियाचा कर्णधार असलेला आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने भारतात नजीकच्या भविष्यकाळात क्रिकेट होणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये होणाऱ्या बदलांवर सचिन तेंडुलकरने आता प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सचिन?

‘क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू तोंडातली लाळ आणि घाम लावून बॉलर कायम घासून घासून चमकती ठेवतात. जेणेकरून बॉलरला स्विंग मिळावा. पण आता ही पद्धत कायमची हद्दपार होण्याची शक्यता आहे. शिवाय, मैदानावर विकेट काढल्यानंतर सर्व फील्डर एकत्र येऊन सेलिब्रेट करतात. गळाभेट घेतात. टाळ्या देतात. पण आता ते सगळं बंद होईल. आता प्रत्येक खेळाडू सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत जास्त सजग असेल. त्यामुळे सेलिब्रेशनही सोशल डिस्टन्सिंग पाळूनच होईल’, असं सचिन म्हणाला आहे.

- Advertisement -

आज २४ एप्रिल रोजी सचिन तेंडुलकरचा ४७वा वाढदिवस आहे. मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सचिनने यावेळी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

‘सध्या सगळं जगच थांबलं आहे. हाच नियम क्रिकेटला देखील लागू होतोच. त्यामुळे क्रिकेट स्पर्धांचं सर्व वेळापत्रक फारसे बदल न करता काहीसं पुढे ढकलता येऊ शकतं’, असं देखील सचिन तेंडुलकरने नमूद केलं. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेली टी-२० वर्ल्डकप स्पर्धा आणि पुढील वर्षी होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धांवर कोरोनाच्या या संकटाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


CoronaEffect: आयपीएल? काही काळ क्रिकेट विसरा आता – सौरव गांगुली!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -