घरक्रीडाबांगलादेशचा वर्ल्डकप हिरो शाकीबवर दोन वर्षांची बंदी

बांगलादेशचा वर्ल्डकप हिरो शाकीबवर दोन वर्षांची बंदी

Subscribe

भारताविरूद्धच्या मालिकेला मुकणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने बांगलादेशचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. भ्रष्टाचार किंवा मॅच फिक्सिंगसंबंधात बुकींनी साधलेल्या संपर्काची माहिती आयसीसीला न दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शाकीबवरील बंदीमुळे बांगलादेशला भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी धक्का बसला आहे.

एका बुकीने मॅच फिक्सिंगसाठी बांगलादेशी अष्टपैलू शाकीब अल हसनशी संपर्क साधला होता. मात्र शाकीबने त्याबाबतची माहिती आयसीसीला देणे अपेक्षित होते. ती त्याने न दिल्याने आयसीसीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयसीसीच्या निर्देशानुसार शाकीब हसनला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अभ्यास दौर्‍यापासून दूर ठेवले. त्यामुळे तो ना अभ्यास दौर्‍यात सहभागी होऊ शकला, ना सराव करु शकला.

- Advertisement -

बांगलादेशी वृत्तपत्रांनुसार शाकीबला दोन वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. मॅचपूर्वी एका बुकीने त्याच्याशी संपर्क साधला होता. नियमानुसार बुकीने संपर्क साधताच खेळाडूने आयसीसीशी संपर्क साधणे आवश्यक असते. मात्र शाकीबने ही माहिती लपवल्याने तो चौकशीच्या घेर्‍यात अडकला. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला होता.

भारत दौर्‍याला मुकणार

- Advertisement -

बांगलादेशी संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. मात्र आता बंदीमुळे शाकीब अल हसन या दौर्‍याला मुकणार आहे. बांगलादेश भारताविरुद्ध तीन टी- 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. शाकीब टी 20 चा कर्णधार आहे. मात्र आता त्याची हकालपट्टी झाली आहे. 3 नोव्हेंबरपासून ही मालिका सुरु होईल. त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

मी माझी चूक मान्य करतो- शाकीब

याप्रकरणी आपली बाजू मांडताना शाकीबने भरपूर दु:ख झाल्याचे म्हटले आहे. मी ज्या खेळावर प्रेम केले. त्यामध्येच माझ्यावर बंदी घातल्याने मला खूपच वाईट वाटत आहे. मात्र मी आयसीसीला माहिती द्यायला हवी होती, ती माझी चूक मान्य करतो. आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक हे खेळाडू आणि खेळातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करत आहे. मात्र मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही, असे शाकीब अल हसनने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -