घरक्रीडाVijay Hazare Trophy : 'हे' मुंबईकर इंग्लंड टी-२० मालिकेसाठी सज्ज; हिमाचलच्या गोलंदाजांचा घेतला...

Vijay Hazare Trophy : ‘हे’ मुंबईकर इंग्लंड टी-२० मालिकेसाठी सज्ज; हिमाचलच्या गोलंदाजांचा घेतला समाचार

Subscribe

मुंबईने हिमाचल प्रदेशचा २०० धावांनी धुव्वा उडवला.

सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूर यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. शार्दूल (९२) आणि सूर्यकुमार (९१) यांनी फटकेबाजी करत हिमाचलच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे आपण इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा २०० धावांनी धुव्वा उडवला. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. याआधी मुंबईने दिल्ली, महाराष्ट्र, पुदुच्चेरी आणि राजस्थान यांच्यावर मात केली होती. त्यामुळे मुंबईचा संघ ‘एलिट गट डी’मध्ये अपराजित राहिला.

आदित्य तरेचेही अर्धशतक

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे फॉर्मात असलेले फलंदाज प्रत्येकी दोन-दोन धावा करून माघारी परतले. त्यामुळे मुंबईची ३ बाद ८ अशी अवस्था होती. परंतु, सूर्यकुमार यादव (७५ चेंडूत ९१) आणि आदित्य तरे (९८ चेंडूत ८३) यांनी मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर अखेरच्या षटकांत शार्दूलने फटकेबाजी करत ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९२ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ९ बाद ३२१ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

सोळंकीच्या ४ विकेट

मुंबईने दिलेल्या ३२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचलने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. त्यांचा डाव अवघ्या १२१ धावांतच आटोपला. त्यांच्याकडून मयांक डागरने एकाकी झुंज देत २० चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. मुंबईकडून प्रशांत सोळंकीने ४ विकेट, तर शम्स मुलानीने ३ विकेट घेतल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -