घरक्रीडाशिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमी अजिंक्य

शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमी अजिंक्य

Subscribe

नितेश रुकेच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने सांगलीच्या हिंदकेसरीचा पराभव करत परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या पुरुषांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी आणि हिंदकेसरी या महाराष्ट्रातील दोन अव्वल खो-खो संघातील अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक झाला. महात्मा गांधी अकादमीने हिंदकेसरीचे कडवे आव्हान १५-१४ असे केवळ १ गुणाने मोडून काढले.

हिंदकेसरीने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतराला महात्मा अकादमीकडे ९-८ अशी एका गुणाची आघाडी होती. महात्मा अकादमीच्या नितेश रूकेने पहिल्या डावात १:५० मि. आणि दुसर्‍या डावात २ मि. संरक्षण करून सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. नितेशला दिपक माधव (१:४०, १:३० मि. संरक्षण), प्रतिक देवरे (१:४०, १:२० मि. संरक्षण) आणि ॠषिकेश मुर्चावडे (१, १:३० मि. संरक्षण) यांनी संरक्षणात सुरेख साथ दिली. तर, आक्रमणात ओमकार सोनावणेने ४ गडी बाद केले.

- Advertisement -

हिंदकेसरीच्या अमोल जाधव (१:२०, १:५० मि. संरक्षण आणि ३ गडी), राहुल तामगावे (१:५० मि. संरक्षण), उत्तम सावंत (२:२० मि. संरक्षण), मिलिंद चावरेकर (१:४० मि. संरक्षण आणि ३ गडी), युवराज जाधव (४ गडी) या अनुभवी खेळाडूंनी सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. ४ फूट ११ इंच गटात युवक क्रीडा मंडळ आणि यजमान विद्यार्थी क्रीडा मंडळ यांच्यातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात युवकने ६-५ अशी १ गुणानी बाजी मारली.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके –

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट आक्रमक : ओमकार सोनावणे (शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमी)
सर्वोत्कृष्ट संरक्षक : उत्तम सावंत (हिंदकेसरी)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : नितेश रूके (शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -