स्टोक्स अष्टपैलूंच्या यादीत अव्वल; TOP 5 मध्ये भारताचे दोन खेळाडू

फलंदाजांच्या यादीत स्टोक्स तिसऱ्या स्थानावर

ben stokes

कोरोनामुळे गेले तीन महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मधील मालिकेने सुरु झालं. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्सला ICC च्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली आहे. ICC ने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावलं आहे. तर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीत स्टोक्सने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला मागे काढत अव्वलस्थान पटकावलं आहे.

बेन स्टोक्स अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल क्रमांक पटकवणारा पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला आहे. ही स्टोक्सच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत भारताचे दोन खेळाडू आहेत. रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. तसेच कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतदेखील स्टोक्सने मार्नस लाबूशेनला मागे काढतत तिसरं स्थान पटकावलं आहे. आता त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली हे दोन फलंदाज आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाचं नेतृत्व करताना स्टोक्स आणि इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केलं. या सामन्यात स्टोक्सने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने दीडशतक (१७६) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (७८) ठोकलं. दोन्ही डावात मिळून त्याने ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ३ सामन्यांच्या मालिकेतील २ सामन्यांनंतर मालिकेत ३४३ धावांसह स्टोक्स सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने पहिल्या कसोटीतदेखील ४३ आणि ४६ धावा अशा धावा केल्या होत्या. मात्र, अर्धशतकाने हुलकावणी दिली. दरम्यान, दुसऱ्या मँचेस्टर कसोटीत वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात करत यजमान इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली आहे.


हेही वाचा –