घरक्रीडाSunil Gavaskar Birthday : विक्रमादित्य गावस्कर! लिटल मास्टरचे काही थक्क करणारे विक्रम

Sunil Gavaskar Birthday : विक्रमादित्य गावस्कर! लिटल मास्टरचे काही थक्क करणारे विक्रम

Subscribe

आज गावस्करांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या काही थक्क करणाऱ्या विक्रमांवर एक नजर. 

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानले जातात. भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची वेळ येते, तेव्हा क्रिकेटप्रेमी बहुतांश वेळा गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी एकाची निवड करतात. १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गावस्करांच्या नावे असे असंख्य विक्रम आहेत किंवा होते, जे करण्याचा त्यांच्याआधी कोणी विचारही केला नव्हता. त्यांनी पदार्पणातच दोन्ही डावांत अर्धशतके केली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आज लिटल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावस्करांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या काही थक्क करणाऱ्या विक्रमांवर एक नजर.

  • गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारे पहिले फलंदाज होते. त्यांनी १९८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या कसोटीत ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. गावस्करांनी १६ वर्षांच्या कारकिर्दीत १२५ कसोटी सामन्यांत १०१२२ धावा केल्या.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम अनेक वर्षे गावस्कर यांच्या नावे होता. त्यांनी कसोटी कारकिर्दीत ३४ शतके केली होती आणि त्यांचा हा विक्रम जवळपास १९ वर्षे अबाधित राहिला. सचिन तेंडुलकरने २००५ मध्ये गावस्करांचा हा विक्रम मोडला होता.
  • गावस्कर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणाच्या मालिकेतच त्यांनी ४ सामन्यांत ७७४ धावा केल्या होत्या, ज्यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. पदार्पणातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम अजूनही गावस्कर यांच्या नावे आहे.
  • सलग १०० कसोटी सामने खेळणारे गावस्कर हे भारताचे एकमेव खेळाडू आहेत. गावस्कर यांनी १९७१ सलामी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ते काही सामन्यांना मुकले. परंतु, १९७५ पासून पुढे त्यांनी सलग १०६ कसोटी सामने खेळले. त्यांच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या एक महिन्यापूर्वी त्यांची ही सलग कसोटी सामन्यांची मालिका खंडित झाली.
  • गावस्कर एकमेव असे खेळाडू आहेत, ज्यांनी दोन मैदानांवर सलग चार शतके केली आहेत. मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि वेस्ट इंडिजचे पोर्ट ऑफ स्पेन या दोन मैदानांवर गावस्कर यांनी सलग चार शतके केली होती.
  • कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद ५ हजार धावांचा विक्रम अजूनही गावस्कर यांच्या नावे आहे. त्यांनी ९५ कसोटी डावांमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला होता. त्यांचा हा विक्रम सचिन, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांसारख्या उत्कृष्ट फलंदाजांनाही मोडता आला नाही.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -