माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर बॅकफूटवर, तब्बल ३३ वर्षानंतर म्हाडाला भूखंड परत

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याकडून तब्बल ३३ वर्षानंतर म्हाडाचा भूखंड परत करण्यात आला आहे. या भूखंडावर अकादमी उभारली नसल्यामुळे गावस्करांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

म्हाडाने क्रिकेटर सुनील गावस्कर यांना वांद्रे येथे २१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड भाडे तत्त्वावर दिलाय. १९८०च्या दशकात सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इंडोर क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी ही जागा देण्यात आली होती. पण अनेक वर्षे उलटली असली तरी त्यांनी प्रशिक्षण संस्था सुरू केली नाही. त्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता. यावर बराच वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे हा भूखंड परत करण्यात आलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल गावस्कर यांनी संबंधित जागा म्हाडाला परत केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मला पत्र लिहिलं आहे. दिलेल्या जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करता आली नाही, त्यामुळे ही जागा मी परत करतोय, असं गावस्करांनी पत्रात म्हटलं आहे. म्हडाने या संदर्भात डिसेंबर २०१९ मध्ये सरकारला कळवले होते की, सुनिल गावस्कर यांच्या सोबत झालेल्या ट्रस्ट सोबतचा करार संपुष्टात आला आहे.

सुनील गावस्करांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत या जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा विचार केला होता. यासंदर्भात गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, या भेटीनंतर जर हे दोन क्रिकेटपटू अकादमी सुरू करणार असतील तर म्हाडाने त्यांना मुदत वाढवून द्यावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, होय, ट्रस्टने जागा सरकारला परत केली आहे. सध्या मी करत असलेल्या कामाचा विचार करता मला त्या जागेवर अकादमी सुरू करणे शक्य होणार नाही. म्हाडाला जर त्या जागेचा विकास करायचा असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि मला आनंदच आहे.

संबंधित जागा ट्रस्टला दिल्यानंतर क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी दिला होता. ही जागी ६० वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. २०११ साली म्हाडाला या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार मिळाली होती. वांद्रेतील संबंधित जागेचा विकास क्रीडा क्षेत्रासाठी कसा करता येईल याच्या पर्यायांवर विचार केला जाईल असे आव्हाड यांनी सांगितले.


हेही वाचा : सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल