घरक्रीडाT20 World Cup : स्टिव्ह स्मिथ टी-२० वर्ल्डकपला मुकणार? अ‍ॅशेसपूर्वी पूर्णपणे फिट...

T20 World Cup : स्टिव्ह स्मिथ टी-२० वर्ल्डकपला मुकणार? अ‍ॅशेसपूर्वी पूर्णपणे फिट होण्याचे लक्ष्य

Subscribe

यंदा अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियात होणार असून पाच सामन्यांच्या या मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ यंदाच्या टी-२० वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मिथच्या कोपराला दुखापत झाली असून त्याने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. तसेच यावर्षीच्या अखेरीस सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याने टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतामध्ये होणार होता. परंतु, भारतातील कोरोनाच्या स्थितीमुळे ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे हलवण्यात आली आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

कसोटी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे

टी-२० वर्ल्डकपला अजून काही काळ शिल्लक आहे. मी तोपर्यंत बहुधा फिट होऊ शकेन. मी दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सध्या ही प्रक्रिया जरा धीम्या गतीने सुरु आहे. मला टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळायला नक्कीच आवडेल. परंतु, माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे अ‍ॅशेसपूर्वी पूर्णपणे फिट होण्याचे माझे लक्ष्य आहे. मागील काही अ‍ॅशेस मालिकांमध्ये मी चांगली कामगिरी केली असून यंदा त्याची मला पुनरावृत्ती करायची आहे, असे स्मिथ म्हणाला.

टी-२० वर्ल्डकपला मुकण्याची तयारी

स्मिथने इंग्लंडमध्ये झालेल्या मागील अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने या मालिकेच्या चार सामन्यांत ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा केल्या होत्या. यात दोन शतकांचा समावेश होता. यंदा अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियात होणार असून पाच सामन्यांच्या या मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होईल. अ‍ॅशेसमध्ये दमदार कामगिरी करण्याइतपत मला स्वतःला फिट करायचे आहे. त्यासाठी टी-२० वर्ल्डकपला मुकण्याचीही माझी तयारी आहे, असे स्मिथने सांगितले.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -