घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना आज

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना आज

Subscribe

उमेश यादवने टाकलेल्या अखेरच्या षटकात १४ धावा काढत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा पहिला टी-२० सामना जिंकत आपण २ सामन्यांची ही मालिका गमावणार नाही हे सुनिश्चित केले. त्यामुळे आता भारताला जर ही मालिका बरोबरीत संपवायची असेल, तर बुधवारी बंगळुरू येथे होणारा दुसरा टी-२० सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताच्या फलंदाजांनी आपले प्रदर्शन सुधारणे गरजेचे आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १२६ धावाच करता आल्या. या सामन्यात शिखर धवनला विश्रांती देऊन लोकेश राहुलला सलामीची संधी दिली. त्याने ३६ चेंडूंत ५० धावा करत संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरवला. मात्र, त्याला वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. या सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीने ३७ चेंडूंत अवघ्या २९ धावाच केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र, त्याला संघातून वगळण्यात येईल याची शक्यता फार कमी आहे. दिनेश कार्तिकला पहिल्या सामन्यात अवघी १ धाव करता आली. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात त्याच्याजागी अष्टपैलू विजय शंकरला संधी मिळू शकेल. शंकरने काही दिवसांपूर्वीच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली होती, तसेच पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसर्‍या टी-२० मध्येही भारताने अनुभवी खेळाडूला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर रोहितच्या जागी शिखरचे संघात पुनरागमन होऊ शकेल.

- Advertisement -

पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक असले तरी गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला १२७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्या टी-२० सामन्यात पुन्हा आपली कमाल दाखवली. त्याने ४ षटकांत १६ धावा देत ३ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला २ षटकांत १६ धावांची गरज असताना त्याने १९ व्या षटकात अवघ्या २ धावा देत २ विकेट घेतल्या होत्या. मात्र, अखेरच्या षटकात उमेश यादवला १४ धावांचा बचाव करता आला नाही. त्यामुळे उमेशला पुन्हा संधी मिळते का की त्याच्या जागी सिद्धार्थ कौलची निवड होते हे पहावे लागले.

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही अप्रतिम प्रदर्शन केले, तर फलंदाजीत खराब सुरुवातीनंतर ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मॅक्सवेलने ५६ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, हे दोघे बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले, पण पॅट कमिन्स आणि जाय रिचर्डसन यांनी संयम ठेवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

त्यामुळे जर भारताला दुसरा सामना जिंकत ही मालिका बरोबरीत संपवायची असेल, तर फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागेल आणि गोलंदाजांना पहिल्या टी-२० तील आपल्या चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

दोन्ही संघांचे संभाव्य ११ खेळाडू –

भारत : लोकेश राहुल, रोहित शर्मा/ शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक/ विजय शंकर, कृणाल पांड्या, उमेश यादव/ सिद्धार्थ कौल, युझवेंद्र चहल, मयांक मार्कंडे, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया : डार्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनीस, अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, पीटर हँड्सकोम्ब (यष्टीरक्षक), अ‍ॅष्टन टर्नर, नेथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅडम झॅम्पा

सामन्याची वेळ – संध्याकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -