Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : अपेक्षाभंग!

Tokyo Olympics : अपेक्षाभंग!

मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताला दमदार 'ओपनिंग' करून दिल्याने आशादायी चित्र निर्माण झाले होते. परंतु, त्यानंतर भारतीय पथकाची गाडी रुळावरून घसरली. 

Related Story

- Advertisement -

‘अपेक्षाभंग’…याच शब्दात टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे वर्णन करता येईल. ऑलिम्पिकला सुरुवात होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला. मागील शनिवारी टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दिवशी पदकांचे खाते उघडले. वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताला दमदार ‘ओपनिंग’ करून दिल्याने आशादायी चित्र निर्माण झाले होते. परंतु, त्यानंतर भारतीय पथकाची गाडी रुळावरून घसरली.

भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांची कमाई केली होती, जी भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी! यंदा भारतीय खेळाडू नवा विक्रम प्रस्थापित करत पदकांचा दुहेरी आकडा गाठतील अशी अपेक्षा होती. मात्र, भारतीय खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या आठवड्यात तरी या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाही. विशेषतः भारताच्या नेमबाजांनी सर्वाधिक निराशा केली आहे.

- Advertisement -

भारताच्या सौरभ चौधरी आणि मनू भाकरसारख्या युवा, तसेच तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांसारख्या अनुभवी नेमबाजांनी मागील दोन-तीन वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. परंतु, भारताच्या नेमबाजांना एकही पदक जिंकता आले नाही. इतकेच नाही तर, सौरभ चौधरीचा (१० मीटर एअर पिस्तूल) अपवाद वगळता भारताचा एकही नेमबाज पात्रता फेरीचा अडथळा पार करू शकला नाही.

तिरंदाजीतही भारतीय क्रीडा चाहत्यांचा अपेक्षाभंगच झाला. दीपिका कुमारसारखी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी खेळाडू चमूत असल्याने भारताला यंदा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच तिरंदाजीत पदक मिळेल अशी आशा होती. परंतु, मोक्याच्या क्षणी दीपिकाचा खेळ खालावला. दीपिकाचा पती अतानू दास, तसेच मराठमोळ्या प्रविण जाधवनेही चांगल्या सुरुवातीनंतर निराशा केली. त्यामुळे यंदाही तिरंदाजीत भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली.

- Advertisement -

बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेन या युवतीने ऑलिम्पिक पदार्पणात उत्कृष्ट कामगिरी करताना किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. परंतु, त्याचवेळी मेरी कोम आणि अमित पांघल या आघाडीच्या बॉक्सर्सना मात्र पदकाने हुलकावणी दिली आहे. मेरी आणि अमित या दोघांनाही यंदा सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरीचे हे अखेरचे ऑलिम्पिक असल्याने ती ‘सुवर्ण’ कामगिरीसाठी उत्सुक होती. परंतु, पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे तिचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तर अमितला ऑलिम्पिक पदार्पणातील पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला.

तसेच बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूही आता सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाली आहे. शनिवारी तिला ताई झू यिंगविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदकानंतर यंदा एक पाऊल पुढे जात सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. आता रविवारी होणाऱ्या सामन्यात सिंधू विजय मिळवेल आणि कांस्यपदकाची कमाई करेल अशीच प्रत्येक भारतीयाला आशा आहे.

- Advertisement -